मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, हात स्वच्छ ठेवा, गर्दीत जाऊ नका, असे आवाहन महापालिका आणि सरकारकडून केले जात आहे. त्यानंतरही अनेक जण मास्क ना लावता रस्त्यावर फिरत आहेत. 20 एप्रिलपासून 26 सप्टेंबरपर्यंत मास्क न लावणाऱ्या तब्बल 14 हजार 234 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 52 लाख 81 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला तेव्हापासून पालिकेचा आरोग्य विभाग कार्यरत झाला आहे. रुग्णांवर उपचार करताना इतर नागरिकांनी काळजी घ्यावी, कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. शिंकताना किंवा खोकताना नाकावर-तोंडावर रुमाल किंवा मास्क नसल्यास कोरोनाचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करण्याचा धोका असतो. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने एप्रिलपासून सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. सुरुवातीला मास्क न घालता फिरल्यास एक हजारांचा दंड केला जात होता. आता 10 सप्टेंबरपासून हा दंड 200 रुपये करण्यात आला आहे. यानुसार मास्क न घालता फिरणाऱ्यांवर पालिकेचे वॉर्डमधील अधिकारी कारवाई करत आहेत. शिवाय घनकचरा विभागातील शेकडो कर्मचारीदेखील मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. ही कारवाई वेगाने आणि परिणामकारकपणे करण्यासाठी घनकचरा विभागातील या कर्मचाऱ्यांना 200 रुपये दंडातील 10 टक्के रक्कम देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मुंबईत 15 सप्टेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत या कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. यामध्ये 200 रुपये दंडाची रीतसर पावतीही नियम मोडणाऱ्याला देण्यात येत आहे. त्यामुळे मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर 200 रुपये भरा, असा इशाराच पालिकेने या कारवाईतून दिला आहे.
13 सप्टेंबरपासून 9 हजार जणांवर कारवाई
मुंबईत 20 एप्रिल ते 12 सप्टेंबर या कालावधीत 4 हजार 989 जणांवर कारवाई करण्यात आली असून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेने 33 लाख 68 हजार 500 रुपयांची वसुली केली आहे. तर दंडाची रक्कम 200 रुपये केल्यानंतर 13 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत तब्बल 9 हजार 245 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 19 लाख 13 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अंधेरी, विले पार्ले, जोगेश्वरीत सर्वाधिक कारवाई
मुंबईत विशेषतः पश्चिम उनगरात अंधेरी ते दहिसर, शहरात ग्रॅंट रोड तर पूर्व उपनगरात भांडूप आणि मुलुंड या विभागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. या विभागातील नागरिकांनी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. त्यानंतरही नियम पाळले जात नसल्याने पालिकेने मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या के/पश्चिम म्हणजेच अंधेरी, विले पार्ले आणि जोगेश्वरी पश्चिम भागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत 918 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 6 लाख 21 हजार 200 रुपये वसूल करण्यात आले आहेत.
हेही वाचा - मुंबईत दिवभरात 4,190 रुग्णांची कोरोनावर मात; 2,261 नवे बाधित, 44 जणांचा मृत्यू