मुंबई - मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोनाचा(Covid -19) प्रसार सुरू आहे. या दीड वर्षात मुंबईकर नागरिकांमध्ये अँटीबॉडीज(Antibodies) तयार झाल्या आहेत. हे आतापर्यंतच्या पाच सेरो सर्व्हेमधून समोर आले आहे. मुंबईत जानेवारीपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरणामुळे नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का याचा अभ्यास करण्यासाठी डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 महिन्यात ६ वा सेरो सर्व्हे(Sixth Sero Survey) केला जाणार आहे. त्याच्या आलेल्या अहवालानंतर बूस्टर किंवा तिसरा डोस देण्याबाबत विचार केला जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी(Suresh Kakani) यांनी सांगितले.
हेही वाचा - 'मी लस घेतली नाही, घेणारही नाही" इंदोरीकर महाराजांच्या विधानावरून वादंग
सहावा सेरो सर्व्हे होणार -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण मोहिम राबवली जात आहे त्याचवेळी नागरिकांना त्यांना माहीत नसताना कोरोना होऊन गेला आहे का याची तपासणी करण्यासाठी सेरो सर्व्हे केले आहेत. आतापर्यंत एकूण पाच सर्व्हे करण्यात आले आहे. त्यामधील एक सर्व्हे हा लहान मुलांचा आहे. मागील पाचही सेरो सर्व्हेक्षणात नागरिकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता लसीकरण केल्यावर मुंबईकरांमध्ये अँटिबॉडीज निर्माण झाली आहे का हे तपासण्यासाठी येत्या डिसेंबर जानेवारी दरम्यान सेरो सर्व्हे केला जाणार आहे.
अहवालानंतर तिसरा, बूस्टर डोसचा विचार -
९९ टक्के मुंबईकरांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ७० टक्के मुंबईकरांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. १६ जानेवारीला सुरु झालेल्या लसीकरण मोहीमेला १६ जानेवारी २०२२ मध्ये वर्षं पूर्ण होत आहे. या वर्षभरात पहिला डोस, दुसरा डोस व डोस न घेतलेल्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीत वाढ झाली का याचा अभ्यास करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यांत ६ वे सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पालिकेच्या २४ वॉर्डातून डोस घेतलेल्या व डोस न घेतलेल्यांचे रक्ताचे नमुने संकलीत करण्यात येणार आहेत. या सर्वेक्षणातून लस किती उपयुक्त ठरली हे स्पष्ट होणार आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुंबईकरांमध्ये किती टक्के अँटीबाॅडीज निर्माण झाल्या आहेत का, याचा अभ्यास करण्यात येईल. या अभ्यासानंतर बुस्टर डोस देणे किंवा तिसरा डोस देणे याबाबत विचार करण्यात येईल, असे काकाणी यांनी सांगितले.
हेही वाचा - लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन नाही; ठाणे पालिकेचा निर्णय