मुंबई - मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलमध्ये मागील महिन्यात आग लागली होती. मात्र, अशा आगी अग्निशमन अधिकारी आणि पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने लागत आहेत. यामुळे अशा अधिकाऱ्यांची चौकशी अतिरिक्त आयुक्तांमार्फत करावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. त्यावर मुंबईतील सर्वच मॉलचे फायर ऑडिट करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले आहेत. मुंबईत लागणाऱ्या आगीबाबत माहिती देणारे प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत सादर करण्यात आले होते. या प्रस्तावावर बोलताना रवी राजा यांनी ही मागणी केली आहे.
सिटी मॉलला आग लागण्यापूर्वी मुंबई अग्निशमन दलाच्या अग्निसुरक्षा पालन अधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह जाऊन भेट दिली होती. या भेटी दरम्यान मॉलमधील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर नऊ महिन्यात या मॉलला आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि पालिका अधिकाऱ्यांनी नक्की या मॉलला भेट दिली होती का? अधिकाऱ्यांनी भेट दिली होती, तर त्यावेळी त्यांना बेकायदेशीर बांधकाम दिसले नाही का? असे प्रश्न रवी राजा यांनी उपस्थित केले आहे.
यावर मुंबईतील सर्वच मॉलमध्ये भेट देऊन तेथील अग्निरोधक यंत्रणा, अनधिकृत बांधकामे, त्या मॉलचे परवाने आदींची कडक तपासणी करण्यात यावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासन व अग्निशमन दलाला दिले. त्याचप्रमाणे, माझगाव दारुखाना येथील काही फॅक्टरीमध्ये अनधिकृत बांधकामे करण्यात आलेली असून अग्निरोधक यंत्रणेचा अभाव आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने या ठिकाणी कडक तपासणी करावी आणि फॅक्टरिंचे फायर ऑडिट करावे, असे आदेशही यशवंत जाधव यांनी यावेळी दिले.