मुंबई - कोरोना विषाणूबाबत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मुंबईतून कोरोना अद्याप गेलेला नाही. लहान मुलांना लस दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडला आहे. मुंबईमधील कोरोनाचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यासाठी सोमवारनंतर बैठक बोलावली जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
बैठकीत आढावा घेऊ -
सध्या देशात केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार लसीकरणाची मोहिम सुरु आहे. मुंबईत नऊ ठिकाणी सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन कर्मचारी, तिसऱ्या टप्यात ५० वर्षावरील नागरीकांसह दिर्घकालीन आजार असलेल्या व्यक्ती यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर, चौथ्या टप्प्यात १८ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण केले जाईल. मात्र, लहान मुलांना लवकर लस उपलब्ध होणार नाही. त्यामुळे मुलांच्या जीवाशी खेळता येणार नाही. मुंबईतील कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. यामुळे शाळा सुरु करण्याचे निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावे लागतील. पालिका शिक्षण विभाग, आरोग्य खात्याची विशेष बैठक सोमवारीनंतर बोलवली आहे. मुंबईतील पालिका शाळा, अनुदानित, विना अनुदानित शाळा सुरु करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. पालिकेच्या शिक्षण विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १६ जानेवारीनंतरही पुढील आदेश मिळेपर्यंत शाळा बंद राहणार असे परिपत्रक काढले आहे.
लसीकरण रद्द नव्हे स्थगित -
को-विन अॅपमध्ये बिघाड झाल्याने अडचणींचा सामना लाभार्थ्यांना करावा लागला. हा बिघाड काढण्यासाठी रविवारी (ता. १७) आणि सोमवारी (ता. १८) लसीकरण स्थगित केले आहे. लोकांनी लसीकरण रद्द झाल्याचे गैरसमज करु नये. केंद्राच्या सुचनेनुसार लसीकरणाची ऑफलाईन नोंदणी करता येत नाही. त्यामुळे अॅपमधील तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर लसीकरण पुन्हा जोमाने सुरु होईल, असे महापौर म्हणाल्या. तसेच बायोटेक लसीला मान्यता देण्यापूर्वी केंद्राने सगळे निर्णय विचार करुन घेतल्याचे महापौर पेडणेकर यांनी सांगितले.
असे प्रकार खपवून घेणार नाही -
ब्रिटनमधील नवा स्ट्रेन समोर आल्यावर पालिकेने कठोर उपाययोजना आखल्या. पालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडून विमानतळावर क्वारंटाईनमधून सुट देण्यासाठी पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार गंभीर असल्याने संबंधितावर तातडीने निलंबनाची कारवाई केली. दोषींची पोलीसांमार्फत चौकशी सुरु आहे. यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या. असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश प्रशासनाला दिल्याचे महापौरांनी सांगितले.
हेही वाचा - ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ‘शर्माजी नमकीन’ त्यांच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित
हेही वाचा - खासगी वाहनातून मास्क न लावता बिनधास्त फिरा - पालिका आयुक्तांचे आदेश