मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांताक्रुझ येथील हॉटेल साई इन येथे अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी येथील चार प्रवासी पळून गेल्याचे समोर आले. या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा क्वारंटाईनमध्ये करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत.
मागील काही दिवसांपासून आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोकेवर काढल्याने राज्य व मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. सामाजिक अंतर व मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आले आहे.
हेही वाचा-फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत फास्टॅग घेण्याचे एमएसआरडीसीचे आवाहन
हॉटेल मालकांवरही गुन्हा नोंदविण्याचे निर्देश -
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, की बाहेरील देशांमध्ये कोरोनाची स्थिती भयंकर असताना अशा प्रवाशांना हॉटेल मालकांकडून सहकार्य मिळत असेल तर गंभीर बाब आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रवाशांना हॉटेलमध्ये सोडल्यानंतर या प्रवाशांची जबाबदारी संबंधित हॉटेल मालकांची असते. हॉटेल मालकाने घडलेल्या प्रकाराबाबत संबंधित पोलिस स्टेशनला व महापालिकेला कळवणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी याबाबत कोणालाही कळवले नाही. पळून गेलेल्या प्रवाशांपासून इतर अनेकजण बाधित होऊ शकतात. त्यामुळे अशाप्रकारचे कोणीही धाडस करू नये. त्यामुळे संबंधित प्रवाशांसह हॉटेल मालकांवरही कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचे महापौर पेडणेकर यांनी सांगितले.
हेही वाचा-गुगल भारतामधील लघू उद्योगांना १०९ कोटींची करणार मदत
नव्या कोरोनाची धास्ती-
नव्या कोरोनाच्या प्रकारामुळे युके, इंग्लंड, आखाती व इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेने हॉटेल उपलब्ध केली आहेत. मात्र, या हॉटेलमधून प्रवासी पळून जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉटेलमध्ये क्वारंटाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यानंतरची जबाबदारी संबंधित हॉटेलची असते. मात्र, काही प्रवासी क्वारंटाईन न होताच थेट घरी पलायन केल्याचे यापूर्वी समोर आले होते. तर विमानतळावर प्रवाशांकडून क्वारंटाईन न करण्यासाठी अधिकाऱ्यांनाही पैसे देण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.