मुंबई - कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मुंबई महापालिकेने आपला मोर्चा आता मालमत्ता कर वसुलीकडे वळवला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी पालिका ऍक्शन मोडमध्ये आली आहे. थकबाकीपोटी आतापर्यंत अनेक ठिकाणी अलिशान वाहनांची जप्ती करण्यात आली, तर काही ठिकाणी जल-जोडणी खंडित करण्यात आली. त्यानंतर अनेकांनी मालमत्ता कर भरल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली.
थकबाकी वसुली
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 5 हजार 200 कोटी रुपये मालमत्ता कर जमा करण्याचे महापालिकेचे लक्ष्य आहे. त्यापैकी आजपर्यंत 3 हजार 650 कोटी रुपये एवढा मालमत्ता कर जमा झाला आहे. इतर थकबाकीदारांनी कर भरावे, असे आवाहन केले होते. त्यानंतरही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाई दरम्यान 'एच पूर्व' विभागातील मे.भारत डायमंड बोर्स यांच्याशी विवादाचा तोडगा काढून 25.86 कोटी इतका मालमता कर वसूल करण्यात आला. तसेच 'मे.रिलायन्स इंडस्ट्रिज लि.' यांच्या विवीध मालमत्तांच्या भांडवली मूल्याविरोधातील प्रलंबित तक्रारीतून 39 कोटी इतक्या मालमता कराच्या रक्कमेची वसूली करण्यात आली.
आलिशान कारवर जप्तीची कारवाई
एम पश्चिम' विभाग कार्यक्षेत्रातील मे. चंदुलाल पी.लोहना (विकासक मे. जय कन्स्ट्रक्शन) यांची मालमत्ता कराची 38 लाख 80 हजार 705 रुपये इतकी थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची मोटार जप्त करण्यात आली. त्यानंतर संबंधितांंद्वारे 19 लाख रुपये इतकी रक्कम जमा करुन मोटार सोडवून नेण्यात आली. एम पश्चिम विभाग कार्यक्षेत्रातील मे. युनीटी लॅण्ड कन्सल्टन्सी यांची मालमत्ता कराची 1 कोटी 10 लाख 22 हजार 240 इतकी थकबाकी असल्यामुळे त्यांच्या मालकीची मोटार जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या बांधकामाच्या जागेवरील ऑफिस 'सिल' केले आणि बांधकाम कार्य बंद करण्यात आले.
जलजोडणी खंडित
'के पूर्व' विभाग हद्दीतील अंधेरी असणाऱ्या 'सोलिटेयर कॉर्पोरेट पार्क' व 'वरटेक्स बिल्डिंग' यांच्या जलजोडण्या खंडित करण्यात आल्या. या कारवाईनंतर मालमत्ता धारकांनी थकीत रकमेच्या 50 टक्के रक्कम 9.60 कोटी व 31 लाख रुपये भरले. 'एम पश्चिम' विभाग कार्यक्षेत्राच्या हद्दीतील 'आयमॅक्स थिएटर'ची मालमत्ता कराची थकबाकी ही 75 लाख रुपये इतकी झाली असल्यामुळे संबंधित मालमत्तेची जलजोडणी खंडित करण्यात आली आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्याच्या हस्ते पर्यावरणपूरक व्हिक्टोरिया गाडीचे उद्घाटन