मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईमधील सी-१ श्रेणीतील म्हणजेच अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या ३३७ इमारतींची यादी जाहीर केली आहे. या ३३७ इमारतींपैकी मुंबई शहर विभागात ७०, पूर्व उपनगरे विभागात १०४ तर पश्चिम उपनगरे विभागात १६३ इमारती आहेत. सर्वाधिक धोकादायक इमारती या पश्चिम उपनगरात आहेत. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱया नागरिकांनी खबरदारीचा उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार आणि उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) चंदा जाधव यांनी केले आहे.
तर इमारती खाली करा - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून गाळ काढणे, रस्ते दुरुस्ती यांच्यासोबतच मुंबई महानगरातील निवासी घरांची आणि अनिवासी जागांची तपासणी करुन त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. यंदादेखील महानगरपालिकेने निवासी व अनिवासी इमारतींचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. तपासणीअंती २५ एप्रिल रोजी सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in वर ही यादी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या इमारती ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीकरीता वापरात आहेत, अशा इमारतींची महानगरपालिका प्रशासनाकडे नोंदणीकृत असलेल्या संरचनात्मक अभियंत्यांद्वारे परीक्षण करुन घेणे अनिवार्य आहे. या अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱया रहिवाशांनी नागरिकांनी त्वरित निवासस्थान रिक्त करावे, तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे तसेच सदर इमारत स्वतःहून मालकांनी निष्कासित करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अतिधोकादायक इमारतींबाबत अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या १९१६ , २२६९४७२५ , २२६९४७२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारची हानी टाळण्याच्या दृष्टीने जागरुक राहणे, ही नागरिकांची देखील जबाबदारी असून त्या कामी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
कोणत्या विभागात किती इमारती धोकादायक - मुंबई शहर विभागात ७० इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. या ७० इमारतींमध्ये ए विभाग ४, बी विभाग ४, सी विभाग १, डी विभाग ४, ई विभाग १२, एफ/दक्षिण विभाग ५, एफ/उत्तर विभाग २६, जी/दक्षिण विभाग ४ आणि जी/उत्तर विभाग १० अशा विभागनिहाय इमारतींचा समावेश आहे. पश्चिम उपनगरांमधील १६३ पैकी एच/पूर्व विभागात ९, एच/पश्चिममध्ये ३०, के/पूर्व विभागात २८, के/पश्चिम विभागात ४०, पी/दक्षिण विभागामध्ये ३, पी/उत्तर विभागात १३, आर/दक्षिण विभागात १०, आर/मध्य विभागामध्ये २२ आणि आर/उत्तर विभागात ८ इमारती सी-१ श्रेणीमध्ये आहेत. तर पूर्व उपनगरातील १०४ इमारतींपैकी एम/पश्चिम विभागात १६, एम/पूर्व विभागामध्ये १, एल विभागात १२, एन विभागात २०, एस विभागात ६ आणि टी विभागात ४९ इमारतींचा समावेश आहे.
अतिधोकादायक इमारत कशी ओळखाल -
- इमारतीच्या आर.सी.सी. फ्रेम कॉलम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत कॉलम झुकल्यासारखे दिसणे.
- इमारतीचे बीम झुकल्यासारखे दिसणे आणि इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणे.
- इमारतीचा तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे.
- इमारतीच्या कॉलममधील भेगा वाढत असल्याचे दिसून येणे.
- इमारतीच्या कॉलममधील काँक्रिट पडत असल्याचे दिसणे.
- इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखे दिसणे.
- इमारतीचा आर.सी.सी. चेंबर्स (कॉलम, बीम) व विटांची भिंत यात सांधा / भेगा दिसणे.
- स्लॅबचे किंवा बीमचे तळ मजल्याचे काँक्रिट पडत असल्याचे दिसणे.
- इमारतीत काही विशिष्ट आवाज होणे.