मुंबई - मुंबईतील दुकाने व आस्थापनांवरील नामफलक मराठीत करण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, दुकान मालकांनी नामफलक मराठीत करण्यासाठी राज्य सरकारकडे मुदतवाढ मागितली आहे. त्यानुसार पालिकेने पुढील आठ ते दहा दिवस आढावा घेण्याचा व या कालावधीत कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मराठी नामफलक करण्यासाठी दुकान चालकांना आणखी आठ ते दहा दिवसांचा कालावधी मिळाला आहे.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुदत - दुकाने, आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. यापूर्वी २०१८ च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार अससेल्या दुकानांवर मराठी पाट्या असणे बंधनकारक होते. मात्र, नव्या नियमानुसार कर्मचार्यांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच व ठळकपणे असावेत, असे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दुकाने व आस्थापनांना ३१ मेपर्यंत नामफलकाच्या पाट्या मराठी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, व्यापाऱ्यांच्या संघटनांनी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी लावून धरली. ही बाब लक्षात घेऊन ही मुदत जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, मद्यविक्रेत्या दुकानांनाही आता महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. याबाबतची कार्यवाही करण्यासाठी ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
तपासणीसाठी ७५ निरीक्षक - दुकाने, आस्थापनांवर मराठी नामफलक लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाकडून प्रत्येक वॉर्डमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी ७५ निरीक्षक असणार आहेत. तसेच त्यांच्या सोबत एक सुविधाकारही राहील. तपासणीत नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आल्यास शिवाय पाहणीप्रसंगी मराठी पाटी लावण्यास नकार दिल्यास न्यायालयात खटला दाखल केला जाईल. न्यायालयीन कारवाई नको असल्यास दंड भरावा लागेल. यामध्ये एका कामगारामागे दोन हजार रुपयांचा दंड न्यायालयीन कारवाईनंतर वसूल केला जाईल.
काय आहे नियम - मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने-आस्थापने आहेत. या सर्वांना हा नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन ) सुधारणा अधिनियम २०२२ मधील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान, आस्थापनाला लागू असलेल्या कलम ७ नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक असणार आहे.
हेही वाचा - Sentenced In Ransom Case : अंडरवर्ल्ड डॉन गुरु साटम चा मुलगा आणि पुतण्याला खंडणी प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा