मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक सहा महिन्यावर आली असताना प्रभाग रचना बदलण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. विशेष म्हणजे ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. प्रभाग पुनर्रचनेचा महाविकास आघाडीमधील राजकीय पक्षांना फायदा होणार आहे. तर भाजपला फटका बसणार असून त्यांच्या जागा कमी होणार आहेत. यामुळे भाजपने या प्रभाग पुनर्रचनेला विरोध केला आहे. यामुळे येत्या कालावधीत राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रभाग रचना बदलली जाणार -
मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. त्याआधी २०१६ मध्ये भाजपाची राज्यात सत्ता असताना प्रभाग पुनर्रचना केली होती. या पुनर्रचनेचा फायदा भाजपला २०१७ च्या निवडणुकीत झाला. २०१२ च्या निवडणुकीत ३२ नगरसेवक असलेल्या भाजपचे २०१७ मध्ये ८२ नगरसेवक निवडून आले. भाजपला ५० जागांचा फायदा झाला. हा फायदा प्रभाग पुनर्रचनेमुळेच झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. येत्या निवडणुकीत भाजपचे पंख छाटण्यासाठी प्रभाग पुनर्रचना केली जाणार आहे. त्याची मागणी काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाने रवी राजा यांची मागणी मान्य केली असून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणार आहे.
काँग्रेसची मागणी -
सन २०१७ मध्ये भाजपचे सरकार होते. यावेळी सरकारने पालिकेच्या २२७ जागांची पुनर्रचना करताना आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या सोयीप्रमाणे जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने पुनर्रचना केली. यात आपल्या पक्षाला कसा फायदा होईल, याकडे पाहिले. त्यामुळे भाजपला ४० ते ५० जागा अधिक मिळाल्या. ही बाब नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरूद्ध होती. तेव्हा काही नागरिकांनी हरकती आणि सूचनांमार्फत या पुनर्रचनेला विरोध करूनही त्यांना न्याय देण्यात आला नाही. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी केलेल्या ४५ प्रभागांच्या पुनर्रचनेत सुधारणा करून ही चूक दुरूस्ती करावी, असे रवी राजा यांचे म्हणणे आहे.
भाजपचा विरोध -
रवी राजा यांनी प्रभाग पुर्रचनेची मागणी केली आहे. या मागणीला भाजपने विरोध केला आहे. प्रभाग पुनर्रचना करू नये असे पत्र भाजपचे मुंबई महापालिकेतील गट नेते प्रभाकर शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. भाजपने प्रभाग पुनर्रचना करण्यास विरोध केल्यानंतरही आयोगाने प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणार आहे. यामुळे येत्या निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे.
भाजपाला बसणार फटका -
भाजप सरकारच्या काळात २०१६ मध्ये प्रभाग रचना बदलण्यात आली होती. यात भाजपला फायदा झाला होता. २०१२ मध्ये भाजपच्या ३२ जागा होत्या. प्रभाग रचना बदलल्यावर २०१७ मध्ये भाजपच्या ८२ जागा निवडून आल्या आहेत. आता प्रभाग रचना बदलल्यास भाजपला या ५० जागांवर फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना याचा फायदा होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल
शिवसेना – ९७
भाजप – ८३
काँग्रेस – २९
राष्ट्रवादी – ८
समाजवादी पक्ष – ६
मनसे – १
एमआयएम – २
अभासे – १
हेही वाचा - रुग्णाला अशा पद्धतीने मिळते 'डेल्टा प्लस व्हेरियंट'ची लागण झाल्याची माहिती
हेही वाचा - अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे, संजीव पलांडे यांना १ जुलै पर्यंत ईडी कोठडी