मुंबई - कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून केंब्रिज, सीबीएसईसह सर्व बोर्डाच्या परिक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्याला मुंबई महापालिकेच्या पालिका आयुक्तांनी परवानगी दिली आहे.
मुंबईमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दहा महिने शाळा बंद आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असला तरी अजूनही संपूर्पणे संकट टळलेले नाही. या पार्श्वभूमीवर शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद असतानाच केंब्रिज बोर्डाच्या ९ वी ते १२ वीच्या परिक्षा २३ जानेवारी पासून सुरू होत आहेत.
हेही वाचा-शाळा सुरू होऊन उलटला दीड महिना मात्र विद्यार्थी उपस्थिती 30 टक्के!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळणे बंधनकारक
मुंबईमधील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्षाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या, सीबीएसई, सीआयएससीई, आयबी, आयजीसीएसई बोर्डाच्या परिक्षा नियोजित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घेण्यास पालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यासाठी कोरोना संदर्भातील मास्क वापरणे, सुरक्षित अंतर पाळणे, सॅनिटायझिंग करणे आदी नियमांचे नेहमीप्रमाणे पालन करावे लागणार आहे.
हेही वाचा-'या'तारखेनंतर सुरू होणार दहावी अन् बारावीच्या परीक्षा - वर्षा गायकवाड
परीक्षा होणार, मात्र शाळा बंदच -
९ ते १२ वीच्या परिक्षा घेण्यास परवानगी देण्यात आली असली तरी कोरोनाचे संकट पूर्णपणे गेलेले नाही. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्याच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे १५ जानेवारीपर्यंत शाळा बंदच राहणार आहेत. मुंबईत कोरोनाचे लसीकरण करण्यास सुरुवात होणार आहे. शाळा सुरू करायची झाल्यास आधी लस द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामुळे शाळा आणखी काही महिने बंद राहण्याची शक्यता आहे.
आरोग्य विभागाची माहिती घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय
ब्रिटनमधून कोरोनाचा नवा विषाणू आल्यामुळे आणखी थोडे दिवसांची वाट बघून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून माहिती घेऊनच शाळा सुरू करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच सांगितले होते.