मुंबई - मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोनाचा ( Corona in Mumbai ) प्रसार आहे. त्यातच आता ओमायक्रॉन या व्हेरियंटचे ( Omicron in Mumbai ) रुग्ण आढळून येत आहेत. विषाणूचा हा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरही जे नागरिक मास्क घालत नाहीत ( Not Wearing Mask ) अशा नागरिकांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. विनामास्क नागरिकांवर, रेल्वे प्रवाशांवर पालिका, क्लिनअप मार्शल तसेच पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या ६५८ दिवसात तब्बल ४३ लाख ४६ हजार ५९६ विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत ८६ कोटी ४२ लाख ४९ हजार ७७१ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
४३ लाख नागरिकांवर कारवाई - मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर विषाणूचा झपाट्याने प्रसार झाल्याने एप्रिल महिन्यापासून नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली. १७ एप्रिल, २०२० ते १८ जानेवारी, २०२२ या ६५८ दिवसात ४३ लाख ४६ हजार ५९६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत ८६ कोटी ४२ लाख ४९ हजार ७७१ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेने ३४ लाख ७७ हजार १९७ नागरिकांवर कारवाई करत ६९ कोटी ३ लाख ६९ हजार ९७१ रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई पोलिसांनी ८ लाख ४५ हजार ५०८ नागरिकांवर कारवाई करत १६ कोटी ९१ लाख १ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर रेल्वेमध्ये २३ हजार ८९१ नागरिकांवर कारवाई करून ४७ लाख ७८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना त्रिसूत्रीचे पालन करा - कोरोना किंवा इतर कोणत्याही विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, हात सतत स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी लस घेतली असली किंवा त्यांच्यामध्ये अॅन्टीबॉडीज निर्माण झाल्या असल्या तरी त्यांना कोरोनाची लागण होऊ शकते. अशा नागरिकांना सौम्य लक्षणे होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, हात सतत स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.
पालिकेची कारवाई
परिमंडळ | विना मास्क फिरणारे | दंड वसूल |
१ | ५ लाख ९८ हजार ८१८ | १२ कोटी ३ लाख ४९ हजार ५०० |
२ | ५ लाख ७२ हजार १३६ | ११ कोटी ४७ लाख ३५ हजार १०० |
३ | ४ लाख ५२ हजार ३९७ | ८ कोटी ३० लाख ५ हजार २०० |
४ | ६ लाख ३० हजार ९५३ | १२ कोटी ६८ लाख ३६ हजार |
५ | ३ लाख ८८ हजार ८०९ | ७ कोटी ७९ लाख २८ हजार २७१ |
६ | ३ लाख ६४ हजार ४८० | ७ कोटी २९ लाख ४० हजार ६०० |
७ | ४ लाख ६९ हजार ६०४ | ९ कोटी ४५ लाख ७५ हजार ३०० |