मुंबई - दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाई केली जाते. मात्र, यंदा नालेसफाईची कंत्राटे मंजूर केली नसल्याने मुंबईत पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात ( Drain Clean Contract Was Not Approved ) आहे. याला सत्ताधारी शिवसेना जबाबदार असून, मुंबईची तुंबई झाल्यास त्याचे खापर पालिका आयुक्तांवर फाटणार आहे. तसेच, पुढील दोन महिन्यांत तब्बल 375 किलोमीटरचे नाले सफाईचे आव्हान पालिका आयुक्तांना पेलावे लागणार ( Bmc Administration Challenge Drain Clean Completed ) आहे.
प्रस्तावांना मंजुरी नाही - दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर मुंबईची तुंबई होते. मुंबईत नालेसफाई योग्य प्रकारे होत नसल्याने पाणी तुंबते, असा आरोप केला जातो. मुंबई महापालिकेकडून दरवर्षी नाले सफाई करण्याचे नियोजन केले जाते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात नालेसफाईची कामे सुरु होणे आवश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पालिका प्रशासन सादर करते. 7 मार्च 2022 ला स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत नाले सफाईसाठी 140 कोटी, मिठी नदी व इतर नद्यांच्या सफाईसाठी 20 कोटी असे सुमारे 160 कोटी रुपयांचे प्रस्ताव सादर झाले होते. पण, सत्ताधारी शिवसेनेकडून या प्रस्तावावर स्थायी समितीत निर्णय न घेता राखून ठेवण्यात आला. 7 मार्चला महापालिकेची मुदत संपल्याने या प्रस्तावावर निर्णय होऊ शकलेला नाही. 8 मार्च पासून पालिका आयुक्तांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आयुक्तांनीही नाले सफाईचे प्रस्ताव मंजूर केलेले नाही. यामुळे मार्च महिना संपला तरी नालेसफाईची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.
नालेसफाई लांबणीवर पडणार - मुंबईत पावसाळ्यात उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता या आधीच नालेसफाईची कामे सुरू करणे आवश्यक होते. मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक भागात नाले कचरा आणि गाळाने ओसंडून वाहत आहेत. काही भागात झोपडपट्ट्यांमध्ये नाल्याचे पाणी शिरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबतची माहिती पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली. कंत्राटदार नियुक्ती प्रस्तावावर आत्तापर्यंत पालिका प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे नालेसफाई लांबणीवर पडणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भाजपा आक्रमक - भाजपाकडून 6 ते 14 एप्रिल या कालावधीत सेवा सप्ताह साजरा केला जाणार आहे. यादरम्यान भाजपा कार्यकर्ते मुंबईकरांची सेवा करणार आहेत. तसेच, सर्व नाल्यांवर जाऊन नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे का याची पाहणी करून त्यावर देखरेख ठेवण्याचे अभियान राबवणार आहे, अशी माहिती भाजपा नेते, आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.