मुंबई - मुंबईत दरवर्षी कमी दिवसात जास्त प्रमाणात पाऊस ( Mumbai Rain ) पडतो. यामुळे शहरात पाणी साचण्याच्या घटना घडतात. मुंबईची तुंबई होते. मात्र, यंदा गेले आठवडाभर मुसळधार पाऊस पडत आहे. रोज १०० ते १५० मिलीमीटर पावसाची नोंद होत आहे. त्यानंतरही 'मुंबईची तुंबई' झालेली नाही. मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही वर्षात केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईची तुंबई झालेली ( Pumping Station Several Areas Help Drainage Of Water In Mumbai ) नाही. विशेष म्हणजे या कामाची स्तुती राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी केली आहे.
'या' केल्या जात आहेत उपायोजना - मुंबई समुद्राच्या किनारी आहे. मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे मुसळधार पाऊस पडल्यास पाणी साचते. २६ जुलै २००५ मध्ये ९९४ मिलीमीटर पाऊस एकाच दिवशी पडल्याने १४९३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. मुंबई ठप्प झाल्याने सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून राज्य सरकार आणि पालिकेने मिठी नदीचे रुंदीकरण, सौंदर्यीकरण, नदी पात्रातील बांधकामे हटवणे, मुंबईमधील पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्रात आणि खाडीत सोडण्यासाठी नाल्यांची रुंदी आणि खोली वाढवणे, पावसाचे पाणी अधिक गतीने समुद्रात सोडता यावे म्हणून पंपिंग स्टेशन उभारणे आदी प्रकल्प हाती घेतले आहेत. मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, सुशोभीकरण याचे काम आजही सुरु आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईत हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, सायन, अंधेरी मिलन सब वे आदी ठिकाणी पावसाचे पाणी १० ते १५ तासांहून अधिक साचलेले असायचे. गेल्या एक दोन वर्षात हा कालावधी कमी झाला आहे. या वर्षी गेले आठवडाभर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यानंतरही हिंदमाता, किंग सर्कल आदी ठिकाणी जास्त वेळ पाणी साचलेले नाही.
६ पम्पिंग स्टेशन सुरु - ब्रिमस्टोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार मुंबईमध्ये एकूण आठ ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करणारी पंपिंग स्टेशन बनवण्याचा निर्णय घेतला होता. या आठपैकी हाजीअली, ईला, लव्ह ग्रोव्ह, क्लीव्हलँड, ब्रिटानिया आणि गझदरबंध या सहा उदंचन केंद्रांची कामे पूर्ण होऊन ती कार्यान्वित झाली आहेत. शहरात साचलेले पाणी पर्जन्य जल वाहिन्यांद्वारे या पंपिंग स्टेशनमध्ये आणले जाते. त्यानंतर समुद्राला भरती नसताना हे पाणी समुद्रात सोडले जाते. समुद्राला भरती असताना पंपिंग स्टेशनचे गेट बंद केले जातात. भरती ओसरल्यावर हे पाणी समुद्रात सोडण्याचे काम या पंपिंग स्टेशन द्वारे केले जाते.
भूमिगत टाक्या - पावसाळ्यात विशेष करून दादर हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, सायन, अंधेरी मिलन सब वे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या ठिकाणी काही वर्षांपूर्वी पाणी साचल्यास ते १० ते १५ तासाहून अधिक वेळ साचून राहत होते. पालिकेने मुंबईमधील पर्जन्य जल वाहिन्यांची क्षमता २५ मिलीमीटर होती ती ५० मिलीमीटर इतकी केली आहे. हिंदमाता परिसरात प्रमोद महाजन गार्डन व झेवीयर्स गार्डन या दोन ठिकाणी मोठ्या भूमीगत टाक्या बनवण्यात आल्या आहेत. या टाक्यांमध्ये ३ कोटी लिटर पाणी साठा होऊ शकतो. हिंदमाता येथील पावसाचे पाणी या टाकीत साचल्यानंतर पंपाच्या साहाय्याने ते समुद्रात सोडण्यात येत आहे. परळ येथे दोन रॅम्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळं यंदा हिंदमाता येथे पावसाचे पाणी जास्त वेळ साचून राहिलेले नाही. मिलन सब वे जवळही अशाच प्रकारच्या भूमिगत टाक्या उभारल्या जात आहेत.
पाणी उपसण्यासाठी ४७७ पंप - मुंबईत ३८६ फ्लडिंग पाॅईट्स म्हणजेच पाणी साचणारी ठिकाणे होती. त्यापैकी यंदा २८२ फ्लडिंग पाॅईट्स कमी झाले आहेत. तर १०४ फ्लडिंग पाॅईट्स असून त्यापैकी ३० फ्लडिंग पाॅईट्स जवळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उर्वरित ७१ ठिकाणी उपाययोजना करण्यात येत असून पुढील दोन वर्षांत ७१ फ्लडिंग पाॅईट्स पूरमुक्त होतील. फ्लडिंग स्पॉट पूर मुक्त करण्यासाठी ८०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा उपसा करण्यासाठी ४७७ पंप कार्यरत आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
मुंबई खऱ्या अर्थानं पूरमुक्त होईल - हिंदमाता व किंग सर्कल येथे पाणी साचल्याने वाहतूक बंद होऊन मुंबई ठप्प होते. हिंदमाता जवळ दोन ठिकाणी भूमिगत पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. यामुळे यंदा हिंदमाता येथे पाणी जास्त काळ साचून राहिलेले नाही. येत्या २ ते ३ वर्षात माहुल व मोगरा पंपिंगचे काम पूर्ण झाल्यावर मुंबई खऱ्या अर्थानं पूर मुक्त होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून कौतुक - मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन अस्त्यव्यस्थ झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिली. यावेळी मुंबईत लावलेल्या ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे मुंबईची पाहणी केली. २०० पेक्षा जास्त पाणी साचण्याची ठिकाणे आहेत. ती आता कमी झाली आहेत. हिंदमाता येथे पाणी साचून राहायचे पण आता ते कमी झाले आहे. पालिकेने पंपिंग स्टेशन उभारली, पंप लावले, इतरही उपाययोजना केल्या यामुळे पाणी जास्त वेळ साचून राहिलेले नाही. हे पालिकेने केलेल्या कामामुळे झाले आहे, असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
उपाययोजनांमुळे पाण्याचा निचरा लवकर - मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता कमी तासात जास्त पाऊस पडला की पाणी साचते. मुंबईमधील साचलेले पाणी बाहेर समुद्रात सोडले जाते. मात्र, त्यावेळी समुद्राला भरती असल्यास शहरात पाणी साचून राहते. ओहोटी सुरु आल्यावर शहरातील पाणी समुद्रात सोडले जाते. त्यामुळे काही काळ पाणी साचते. पाण्याचा निचरा करता यावा म्हणून मोठे पंप लावण्यात आले आहेत. त्याद्वारे पाण्याचा उपसा केला जातो. तसेच, मुंबईमध्ये सहा ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. त्याद्वारे साचलेले पाणी समुद्रात सोडले जाते. हिंदमाता येथे भूमिगत टाक्या उभारण्यात आल्या आहेत. यामुळे यावर्षी जास्त वेळ पाणी साचलेले दिसले नाही. मुंबईमध्ये पाणी साचणार नाही, असा दावा कधीच कोणीही करणार नाही. गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे पाण्याचा निचरा लवकर होत आहे. त्याची स्तुती राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.