मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट अटोक्यात येत असताना. म्युकरमायकोसिस हा आजार पसरत आहे. महाराष्ट्रात म्युकरमायकोसीस म्हणजे काळी बुरशीचे सुमारे 2 हजार 245 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर मुंबईत सुमारे 225 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. एकीकडे काळीबुरशी आजाराने थैमान घातले असताना देशात नव्या पांढऱ्या आणि पिवळ्या बुरशीच्या आजाराने डोके वर काढले आहे. हे आजार बरे होणारे आहे तरीही काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख म्हणाले.
रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्यांना आहे काळ्या किंवा पांढऱ्या बुरशीचा जास्त धोका
याबाबत मुंबईच्या केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख म्हणाले, बुरशीजन्य आजाराला कोणत्याप्रकारे घाबरण्याची गरज नाही. हे सर्व आजार उपचारानंतर बरे होणारे आजार आहेत. पहिल्या लाटेत म्युकरमायकोसिस हा आजार दिसला नाही. मात्र, दुसऱ्या लाटेत याचे रुग्ण दिसून आले आहे. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा रुग्णांना या आजाराची लागण होत असते. त्याबरोबर कोरोना काळात ज्यांचा मधूमेह नियंत्रणाच्या बाहेर आहे अशा रुग्णांना काळी बुरशी हा आजार होण्याची दाट शक्यता असते. देशात म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशीचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईत 225 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत यातील 90 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित रुग्ण मुंबईच्या महापालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या आजारांमध्ये म्युकरमायोकसिस हा आजार जास्त घातक असल्याचे अधिष्ठाता देशमुख यांनी सांगितले. काळी बुरशी ही नाकावाटे डोळे तसेच मेंदुपर्यंत पोहोचते. यामध्ये अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागतात. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असेही डॉ. देशमुख म्हणाले.
पिवळ्या व पांढऱ्या बुरशीचे रुग्ण महाराष्ट्राबाहेर
काळ्या बुरशी आजाराचे रुग्ण जरी असतील तरी पिवळ्या आणि पांढऱ्या बुरशीचे रुग्ण महाराष्ट्राबाहेरील राज्यात दिसून आले आहेत. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा रुग्णांना पांढऱ्या बुरशीची लागण होते. तसेच ज्यांची केपोथेरपी होते त्यांनाही पांढरी बुरशी होण्याची दाट शक्यता असते, अशी माहिती डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.
क्षय रोगाची लागण असलेल्यांना होऊ पिवळ्या बुरशीचा धोका
पिवळी बुरशी हा आजार विशेष करुन ज्यांना बऱ्याच दिवसांपासून क्षय रोगाची लागण झाली आहे. अशा रुग्णांना या पिवळ्या बुरशी आजाराची लागण होते. हा आजार फुप्फुसाशी संबंधीत असल्याची माहिती अधिष्ठाता देशमुख यांनी दिली.
हेही वाचा - के. बी. भाभा रुग्णालय होणार १२ मजली , पालिका ३०२ कोटी रुपये खर्च करणार