मुंबई : सचिन वाझे प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राज्य सरकारवर सोशल मीडियातून हल्लाबोल केला आहे. सचिन वाझे प्रकरणाचा धागा पकडून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गृहमंत्री अनिल देशमुखांना भाजपने लक्ष्य केले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे.
भाजपच्या ट्विटर खात्यावरून वेगवेगळे ट्विट टाकून गृहमंत्र्यांसह राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपने राज्य सरकारविरोधात एक प्रकारे सोशल वॉरच पुकारले आहे. सचिन वाझे प्रकरणी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आता भाजपकडून केली जात आहे. सोशल मीडियावर #ResignAnilDeshmukh हा हॅशटॅग भाजपकडून ट्रेंड केला जात आहे.
भाजपची ट्विट मालिका
!['आजचा शोले' भाजपची बोचरी टीका](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/shole_1603newsroom_1615894105_975.jpg)
'आजचा शोले' भाजपची बोचरी टीका
शोले या चित्रपटातील गब्बरसिंह ठाकूरचे हात कापत असल्याच्या दृश्याचे एक व्यंगचित्र ट्विट करत राज्य सरकारवर बोचरी टीका भाजपने केली आहे. "शोले आजच्या काळात महाराष्ट्रात घडला असता तर तो काहीसा असा असता...!!" असे ट्विट या व्यंगचित्रासोबत करण्यात आले आहे. राज्य सरकारमध्ये अधिकारांवरून रस्सीखेच सुरू असल्याचेच भाजपने या व्यंगचित्रातून सुचविले आहे.
![चंद्रकांत पाटील यांचे ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/chandrakant-patil_1603newsroom_1615894105_642.jpg)
चंद्रकांत पाटलांकडून राजीनाम्याची मागणी
"मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांच्या पदावर असेपर्यंत सचिन वाझे प्रकरणाची योग्य चौकशी होणार नाही.त्यामुळे पोलिस आयुक्त आणि गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा." असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
![परमबीर सिंहांच्या राजीनाम्याची मागणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/parambir_1603newsroom_1615894105_818.jpg)
परमबीर सिंहांच्या राजीनाम्याची मागणी
"सचिन वाझेचे प्रकरण फार गंभीर आहे.मात्र याचे गांभीर्य लक्षात न घेता वाझेला मोकाट सूट देणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा.मुंबई पोलिसांचा कसलाही तपास नाही.मुळात ठाकरे सरकारच्या ताटाखालचे मांजर होणाऱ्यांकडून जनतेच्या सुरक्षेची अपेक्षा करणंच चूक!" असे ट्विट भाजपने केले आहे.
![महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/ncp-padadhikari_1603newsroom_1615894105_220.jpg)
महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
"सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचा युवा प्रदेशाध्यक्ष महिलेवर बलात्कार करून सुद्धा मोकाट फिरत आहे, मात्र गृहमंत्री यांनी तो स्वतःच्या पक्षाचा असल्यामुळे कसलीही कारवाई केली नाही. हे असंच सुरू राहिलं तर आपल्या माता-भगिनी कशा सुरक्षित राहतील?" असे ट्विट भाजपने केले आहे.
![पूजा चव्हाण प्रकरण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/pooja-chavan_1603newsroom_1615894105_1001.jpg)
पूजा चव्हाण प्रकरण
"मंत्री संजय राठोड पूजा चव्हाण या तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो, त्याचा फक्त राजीनामा घेतला जातो, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे... मग या सर्व प्रकरणात गृहमंत्री साहेब तुम्ही काय केलं? तुमचं कर्तव्य विसरलात की आठवण करून द्यावं लागेल !" असे ट्विट भाजपने केले आहे
![हिंगणघाट प्रकरणावरून लक्ष्य](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/hinganghat_1603newsroom_1615894105_227.jpg)
हिंगणघाट प्रकरणावरून लक्ष्य
"एका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळले जाते, या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. घटनेला एक वर्ष पूर्ण झालं, मात्र अजूनही दोषीवर कठोर कारवाई करण्यात आली नाही. गृहमंत्री तिला न्याय कधी मिळणार, हे एकदाचं जाहीर करावं." असे ट्विट भाजपने केले आहे.
![शर्जील उस्मानी प्रकरणी गृहमंत्री लक्ष्य](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/sharjil_1603newsroom_1615894105_527.jpg)
शर्जील उस्मानी प्रकरणी गृहमंत्री लक्ष्य
"विकृत बुद्धीचा शर्जील उस्मानी शिवरायांच्या महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकतो. मात्र दुर्दैवाने गृहखातं त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाही, कारण आपले गृहमंत्री गाढ झोपेत आहेत." असे ट्विट भाजपने केले आहे.
![साधू हत्येच्या मुद्द्यावरून टीका](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/sadhu_1603newsroom_1615894105_988.jpg)
साधू हत्येच्या मुद्द्यावरून टीका
"महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत निर्दोष साधूंची १०० जणांच्या जमावाकडून निर्घृण हत्या होते, मात्र त्यावर एक शब्दही आपले गृहमंत्री काढत नाहीत, कारवाई तर दूरच. मारेकरी अजूनही मोकाट फिरताहेत, हीच शोकांतिका !" असे ट्विट भाजपने केले आहे.
![पोलीस भरतीवरूनही टीका](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/police-bharati_1603newsroom_1615894105_127.jpg)
पोलीस भरतीवरूनही टीका
"रात्रंदिवस मेहनत करून पोलीसांत भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांच्या वाट्याला निराशाच... पोलीस भरतीबाबत कसलीही घोषणा नाही, मुलांच्या भविष्याशी खेळ चालला आहे. गृहमंत्रीसाहेब, तुमच्या बेजबाबदारपणामुळे या मेहनत करणाऱ्या मुलांनी जीव द्यावा का?" असे ट्विट भाजपने केले आहे.
हेही वाचा - एटीएसचे 'वराती मागून घोडे'.. तपासाच्या नावे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न ?