मुंबई - कोरोना लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व मुंबईकरांचे लसीकरण मोफत करावे, 45 वर्षांवरील नागरिकांसाठी वेगळी रांग असावी, 80 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी स्वतंत्र रांगेची सोय करुन वरिष्ठ नागरिकांना होणारा मनस्ताप टाळावा. तर नोंदणीनंतर वॉक इन लसीकरण न करता कोविन अॅपवर वेळ घेऊनच लसीकरणाची तारीख आणि वेळ मिळाल्यावर लसीकरण करावे आदी मागण्या भाजपाचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल व अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
प्रत्येक वयोगटासाठी वेगळी रांग -
कोरोना महामारीत बाधित रुग्ण संख्या रोखण्यासाठी व्यापक लसीकरण हाच एकमेव पर्याय पुढे आला आहे. गेले तीन दिवस महापालिकेने लसीकरण केंद्रांवर 45 वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस अथवा दुसरा डोस मिळणार नाही असे घोषित केले आहे. यापुर्वी सुद्धा आठवडाभर लसींची कमतरताच असल्यामुळे सर्व खाजगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण पुर्णत: थांबविलेले आहे. आणि त्यामुळे गेले 10 दिवस शासकीय केंद्रांवरील लसीकरणासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. यामध्ये वरिष्ठ नागरिकांना विशेषत: 80 वर्षांवरील अती वरिष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसीकरण केंद्रावरील उसळलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढत आहे व लसीकरणाच्या प्राथमिक उद्दिष्टास हरताळ फासला जात आहे. सुयोग्य नियोजन केल्यास लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळता येईल व कोरोनाचा प्रादुर्भावही रोखता येईल व लसीकरण जलद गतीने करता येईल असे शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
काय आहेत मागण्या -
- सर्व मुंबईकरांचे मोफत लसीकरण करावे.
- 45 वर्षांवरील ज्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे. त्यांची स्वतंत्र रांग लसीकरण केंद्रांवर लावण्याच्या सूचना द्याव्यात.
- अती वरिष्ठ नागरिक म्हणजेच 80 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी स्वतंत्र रांगेची सोय करावी.
- 45 वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस घ्यायचा असेल तर नोंदणीनंतर वॉक इन लसीकरण न करता कालबद्ध पूर्व नियोजित वेळेनुसारच लसीकरण करण्यात यावे. (Pre booked appointment)
- 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना नोंदणी नंतर आगावु निश्चित केलेल्या वेळेनुसारच (Pre booked appointment) लसीकरण करण्यात यावे.
- मुंबईकरांचे लसीकरण लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी पुरेसा लसीचा पुरवठा प्रत्येक लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करावा.
- सर्व लसीकरण केंद्रे किमान 12 तास आणि आवश्यक असेल, शक्य असेल तिथे 24 तास लसीकरणासाठी उघडी ठेवावीत व सर्व लसीकरणाची प्रक्रिया आगावु निश्चित केलेल्या वेळेनुसारच (As per strictly pre booked appointment) करावी.