मुंबई - महाविकास आघाडीच्या गलथान कारभारामुळे वीजग्राहकांना भरमसाठ वीजबिले आली आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसांमध्ये सरकारने वीजबिलात सवलत देण्याचा निर्णय न घेतल्यास, मंत्रालयात घुसून आंदोलन करू, असा इशारा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. भाजपकडून आज महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.
सरकारच्या चुकीमुळे ग्राहकांना प्रचंड वीजबिल आले आहे. कोरोनामुळे आधीच नागरिक अडचणीत आहेत, हातात पैसा नसताना बील भरण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे बिलात सवलत मिळावी, यासाठी आज भाजपच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
सरकारकडून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे पाप
ऊर्जामंत्र्यांनी वाढीव वीजबिलात सवलत देण्याचे आश्वासन दिले. मात्र ऊर्जा खाते हे काँग्रेसकडे असल्याने, वाढीव वीजबिलात सवलत देण्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यास मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी नकार दिला आहे. श्रेयवादाच्या लढाईत राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचे पाप हे सरकार करत आहे. मात्र जोपर्यंत वीजबिलात सवलत मिळणार नाही, तोपर्यंत भाजप आंदोलन करतच राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले. कोरोना काळात जनतेला वेठीस धरणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला आगामी काळात जनता शॉक दिल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही यावेळी भातखळकर यांनी केली.