मुंबई - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेली बिहार विधानसभा निवडणुकीसह अन्य राज्यातील पोट निवडणुकांचे निकाल मंगळवारी मतमोजणी सुरू झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर जाहीर झाले. पोटनिवडणुकीत गुजरात, मध्य-प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, तेलंगणा या राज्यांत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. याचाच आनंद उत्सव आज मुंबईतील भाजपा कार्यालयात भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाने ७४ जागी विजय मिळवला. या विजया बद्दल भारतीय जनता पार्टी मुंबईच्यावतीने विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाद यांचा नेतृत्वाखाली भाजप नेते, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. यावेळी एकमेकांना मिठाई वाटून बँड वाजवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
घोषणांनी दणाणला परिसर-
बिहार विधानसभा निवडणुकीसह इतर राज्यातील पोटनिवडणुकीत विजय मिळवल्याने भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा आनंद शिगेला पोहोचला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो... नरेंद्र मोदी जैसा हो , भारत माता की जय, बिहार तो अभी झाकी है, पश्चिम बंगाल अभी बाकी है' अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी मुंबई भाजप कार्यालायचा परिसर दणादूण सोडला होता.