मुंबई - एसटी प्रश्नांवर सरकार गंभीर नाही. विद्यार्थ्यांचे व जनतेचे हाल होत आहेत. अस असताना आमदारांना फुकट घर देण्याची गरज काय? असा प्रश्न भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. विधानभवनात ते बोलत होते. एसटी संप मिटत नसल्याने सामान्य जनतेचे विशेष करून ग्रामीण भागात जनतेचे मोठे हाल होत आहेत. जळगावात बोधवड येथे एका विद्यार्थिनीचा खाजगी वाहनातून पडून मृत्यू झाला. पण तरीसुद्धा सरकारला पाझर फुटत नाही.
खासगी गाडीतून पडून मृत्यू - आज एका विद्यार्थिनीचा खाजगी प्रवासामध्ये जीव गेलेला आहे व त्याच्या आईने स्वतः सांगितले आहे की आज एसटी सुरू असती तर हे झाले नसते आणि तरीसुद्धा सरकार चालढकल करत आहे. प परिवहन मंत्री फक्त या संदर्भामध्ये निवेदन करणार, निवेदन करणार असं म्हणत आहेत. परंतु सरकार याबाबत गंभीर नाही, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. विशेष करून एसटी संदर्भात या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तोडगा निघेल अशी अपेक्षा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून होती. परंतु आज अधिवेशनाची सांगता होत असताना सुद्धा याबाबत तोडगा निघाला नाही या कारणाने जनतेमध्ये रोष असून सामान्य लोकांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत असेही ते म्हणाले.
आमदारांना फुकट घर कशाला? - आमदारांना मुंबईमध्ये तीनशे घरे उपलब्ध करून दिली जातील. हा निर्णय काल घेण्यात आला. या मुद्द्यावर बोलताना त्याची काही आवश्यकता नव्हती. आपले आमदार पळून जातील या भीतीने हे सर्व कारस्थान चालू आहे. अगोदर आमदारांच्या दोन कोटींचा निधी पाच कोटीवर देण्यात आला. आता त्यांना मुंबईत घर देण्याचे आमिष दाखवले जात आहे. वास्तविक आमदार जेव्हा लोकप्रतिनिधी निवडून येतो तो त्याच्याकडे घर नसतं म्हणून नाही येत. तर जनतेच्या सेवेसाठी आलेला असतो आणि त्यांनी जनतेची सेवा करायची असते. परंतु अशा पद्धतीच्या घर देण्याच्या प्रश्नावर त्याला कडाडून विरोध असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितला आहे.
शिवसेना खड्ड्यात घालण्याचे काम संजय राऊत करत आहेत! - संजय राऊत यांनी शिवसेनेला खड्ड्यात टाकण्याची सुपारी घेतलेली आहे. शिवसेनेची वाट लावायला संजय राऊत निघाले आहेत, असा खोचक टोला ही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. शिवसेनेमध्ये दिवाकर रावते, रामदास कदम, अनिल देसाई असे मोठ-मोठे नेते असताना सुद्धा ते याप्रश्नी काहीच बोलत नाहीत व संजय राऊत एकीकडे एक कलमी कार्यक्रम चालवत आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.