मुंबई - भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक मंगळवारी (दि. 16 नोव्हेंबर) मुंबईमध्ये संपन्न होत आहे. या बैठकीदरम्यान राज्याचे प्रभारी सी.टी. रवी यांनी हिंमत असेल तर विधानसभा बरखास्त करा व पुन्हा निवडणुका घ्या, असे आव्हान करत सध्याचे मुख्यमंत्री हे पार्टटाईम आहेत, अशी टीकाही केली.
जनतेला फुलटाईम मुख्यमंत्री हवा आहे...
महाविकास आघाडीला दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत असताना आज भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईतील वसंत स्मृती येथे संपन्न होत आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत राज्याचे प्रभारी सी.टी. रवी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील त्याचबरोबर राज्यातील भाजपचे सर्व आमदार व खासदार आणि केंद्रीय नेतेही उपस्थित आहेत. या बैठकीला संबोधित करताना राज्याचे प्रभारी सी.टी. रवी यांनी शिवसेनेवर निशाणा साधत सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत आणि राज्याला फुलटाईम मुख्यमंत्र्यांची गरज आहे, असेही वक्तव्य त्यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीचे...
भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत आज तीन ठराव मांडले जात आहेत. यामध्ये बैठकीच्या सुरुवातीला भाषण करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे असून गेंड्यालाही आता लाज वाटायला लागली आहे, असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे. मालेगाव, नांदेड, अमरावतीमध्ये झालेल्या दंगली या त्रिपुराच्या पार्श्वभूमीवर झाल्या होत्या. पण, त्रिपुरामध्ये अशा पद्धतीची कुठलीही दंगल झाली नव्हती, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजप कार्यकर्त्यांनी सरकार कधी येईल याची वाट न बघता मोठ्या प्रमाणामध्ये जनतेची काम करण्यासाठी पुढे यावे, असेही चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत सांगितले. आपण कुठे कमी पडलो याचाही विचार करायला पाहिजे. पण, राज्यात सध्या सरकार नसले तरीही जनतेची काम प्रामुख्याने करायला हवी त्यासाठी आपण कुठेही कमी पडता कामा नये, असेही चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत सांगितले आहे.
हे ही वाचा - व्हाईट दुबे कोण?, काशिफ खान आणि समीर वानखडेचे काय संबंध? मलिकांनी केले WhatsApp चॅट्स उघड