मुंबई - मुंबई महापालिकेच्या चिटणीस विभागात काम करणाऱ्या संभाजी पाटील यांनी महिलेशी असभ्य वर्तन केल्याने तसेच महापौरांच्या लेटर हेडचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याला ११ वर्षानंतर पालिकेच्या सेवेत पुन्हा सामावून घेण्याचा प्रस्तावाला भाजपने विरोध करत बैठकीतून सभात्याग केला. तर या कर्मचाऱ्याची नियुक्ती योग्य असल्याचे सांगत हा प्रस्ताव मंजूर केला. या दरम्यान भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आली.
हेही वाचा - ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध आदेश लागू
भाजपचा सभात्याग -
मुंबई महापालिका चिटणीस विभागात काम करणारे संभाजी रंगराव पाटील याची एप्रिल १९९३ मध्ये पालिका चिटणीस खात्यात टंकलेखक पदावर नियुक्ती झाली होती. महिलेशी गैरवर्तन, महापौरांच्या लेटरहेडचा गैरवापर करून नोकरीचे आमिष दाखवून १७ लाख रुपयांचा अपहार केल्याने त्यांना दोषी ठरवत स्थायी समितीने १४ डिसेंबर २०१० रोजी निलंबित केले. २०१२ ला त्यांची चौकशी समिती मार्फत चौकशी लावण्यात आली. चौकशी समितीने पाटील यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्याचा अहवाल देत निर्दोष सोडले. पाटील गेले ११ वर्षे निलंबित होते. या कालावधीत पालिकेने त्यांना निलंबित कालावधीत २०-२५ लाख रुपये पगार दिला आहे. घरी बसून पगार देण्यापेक्षा या कर्मचाऱ्याकडून काम करून घेऊन पगार द्यावा अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली. संभाजी पाटील यांच्यावर महिलेशी गैरवर्तन करणे, महापौरांच्या लेटरहेडचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करणे आदी गंभीर गुन्हे आहेत. त्यांच्या विरोधात कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना त्यांना पुन्हा कामावर घेऊ नये, असे सांगत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट आदी भाजप सदस्यांनी तीव्र विरोध केला. मात्र तरीही त्यांच्या विरोधाला न जुमानता शिवसेनेने प्रस्ताव मंजूर केल्याने भाजप सदस्यांनी तीव्र निषेध व्यक्त करीत सभात्याग केला.
राजकारण करू नये -
पुनर्विलोकन समितीने तयार केलेले निकष याआधारे पाटील यांना पुन्हा पालिकेच्या सेवेत घेण्याबाबतचा निर्णय स्थायी समितीमध्ये बहुमताने घेण्यात आला आहे. भाजपने मुंबईच्या विकास प्रकल्पांबाबतच चर्चा करावी, जी विकास कामे आम्ही मुंबईकर जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने करीत आहोत आणि या पुढेही करीत राहू असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले. कर्मचा - यांच्या नियुक्ती, पदोन्नती, पुनर्स्थापन बाबतीत राजकारण करु नये. असे आवाहन जाधव यांनी केले आहे.
हेही वाचा - लसीच्या तुटवड्यानंतर पालिकेला जाग; कांजूर लस साठवणूक केंद्राचे उद्घाटन