मुंबई - महापलिकेच्या अर्थसंकल्पात पुढच्या दाराने कुठलीही करवाढ करायची नाही, असे म्हणत मागच्या दाराने सर्व सेवांवरील शुल्क वाढ करण्यासाठी “स्वतंत्र शुल्क सुधारणा प्राधिकरण” नियुक्त करण्याबाबत अर्थसंकल्पीय निवेदनात महापालिका आयुक्तांनी जाहीर केलेल्या भूमिकेस भाजपाचा तीव्र विरोध असल्याचे भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. तसे पत्र शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.
स्वतंत्र शुल्क सुधारणा प्राधिकरण
मुंबई महापालिकेचा ३९ हजार ०३८.८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प नुकताच पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात करवाढ लादली नसली तरी शुल्कवाढ करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच सर्व सेवांवरील शुल्क वाढ करण्यासाठी “स्वतंत्र शुल्क सुधारणा प्राधिकरण” नियुक्त करण्याबाबत अर्थसंकल्पात म्हटले आहे.
पालिका आयुक्तांना पत्र
भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र दिले असून "स्वतंत्र शुल्क सुधारणा प्राधिकरण” नियुक्त करण्यास विरोध असल्याचे कळविले आहे. एका बाजूला करवाढ केली नाही म्हणायचे आणि दुसरीकडे शुल्क वाढ करायची हे योग्य नसल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. पालिका सभागृह, स्थायी समिती यांना विश्वासात न घेता नवे प्राधिकरण सुरू करण्यास आमचा विरोध असल्याचे शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.