मुंबई - तीन वर्षांचा कालावधी लोटूनही गोरेगाव (पश्चिम) पहाडीगाव येथील नोकरदार महिलांसाठी उभारण्यात येणारे बहुउद्देशीय वसतिगृह अद्यापही पूर्ण झाले नाही. या गंभीर प्रश्नाकडे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका प्रिती सातम यांनी मंगळवारी झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या चर्चेत लक्ष वेधले. याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने भाजपा नगरसेविकांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
हेही वाचा - निर्भीओ निर्भय....अन् वडिलांच्या अस्थी राखेतून तिने साकारला टॅटू
प्रत्यक्षात काम नाही
जेंडर बजेटमध्ये महिलांसाठी असलेल्या राखीव निधीचा विनियोग आणि प्रस्तावित कामाची अंमलबजावणी करण्याबाबत महापालिका आयुक्त दिरंगाई करत असल्याचा आरोप करत नगरसेविका प्रिती सातम यांनी केला आहे. त्यांनी महिला व बालविकास समितीच्या बैठकीत वरील मुद्दा मांडला. यावेळी गोरेगाव येथे कोट्यवधी रुपये खर्चून नोकरदार महिलांसाठी १५ मजली वसतीगृह बांधण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला होता. त्यानंतर प्रत्यक्षात वसतीगृहाच्या कामाची अंमलबजावणी झाली नाही. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या गरीब व गरजू महिलांचा विचार पालिकेच्या अर्थसंकल्पातील जेंडर बजेटमध्ये करण्यात आल्याचा केवळ देखावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र, काम होत नसल्याची टीका नगरसेविका प्रिती सातम यांनी केली.
हेही वाचा - फडणवीस सरकारमध्ये आरएसएसचा किती वाटा होता; नाना पटोलेंचा पलटवार
प्रशासन उदासीन
नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास असलेल्या महिला-मुली कमी घरभाडे आणि सुरक्षित घराच्या शोधात असतात. पण सुरक्षेच्या हमीसाठी काहींना दामदुप्पट घरभाडे मोजावे लागते. तर अनेकदा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. अशा महिला- मुलींसाठी बहुउद्देशीय वसतिगृह फायद्याचे ठरते. मात्र, ढिम्म पालिका प्रशासन महिला वसतीगृहासाठी असणाऱ्या 10 कोटी रुपयांच्या तरतुदींची अंमलबजावणीसाठी तातडीने करण्यास टाळाटाळ करत आहे. तीन वर्ष होऊनही गोरेगाव येथील महिला वसतिगृहाचे बांधकाम पुढे सरकले नाही.भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी महिला सुरक्षितता आणि सबलीकरणाबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी चर्चेत नगरसेविका योगिता कोळी, जागृती पाटील, रिटा मकवाना, दक्षा पटेल, सुरेखा पाटील, शीतल गंभिर-देसाई यांनी सहभाग घेतला. पालिका प्रशासनाने महिलांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने भाजपा नगरसेविकानी ठिय्या आंदोलन केले.