मुंबई - अटीतटीची झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे होते. अशात आपापल्या आमदारांना मतदाराचा हक्क बजावण्यासाठी सर्वच पक्षांनी व्हीप जाहीर केला होता. अशात भाजपाचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप ( Pimpri Chinchwad MLA Laxman Jagtap ) यांना रुग्णालयातून काही दिवसांपूर्वीच डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak MLA of Kasba Peth constituency ) या कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्या देखील आज ( शुक्रवारी ) विधानभवनात अँब्युलन्सने दाखल झाल्या. लक्ष्मण जगताप यांना घेण्यासाठी स्वतः देवेंद्र फडवणीस आले होते. तर त्यांनी या दोघांचे मनापासून आभार मानले आहेत.
'भाजपा, विचार आणि ध्येयासाठी सर्वोच्च समर्पण' : ट्विट करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रकृतीच्या गंभीर तक्रारी असताना सुद्धा मतदानाला आलेले आमचे मित्र लक्ष्मण जगताप आणि माझ्या भगिनी मुक्ताताई टिळक यांचे आभार मानावे तरी कोणत्या शब्दात ? शब्द अपुरे पडतील. या दोघांनीही आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. विधान भवन, मुंबई येथे आज त्यांचे स्वागत केले. तेव्हा त्यांचा तोच उत्साह होता. जो भाजपाच्या नियमित कार्यक्रमांमध्ये असतो. लक्ष्मण जगताप यांनी दाखविलेली आश्वासक मुद्रा मी कधीच विसरू शकणार नाही. दोघांचेही अगदी मनापासून आभार !
'पक्षावर निष्ठावंत प्रेम' : जगताप हे गेल्या दोन महिन्यांपासून प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल होते. मधल्या काळात त्यांचा आजार इतका बळावला होता की, ते कोमातही गेले होते. दरम्यान, कोमातून बाहेर आल्यानंतर २ जून रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यांची एकूण प्रकृती पाहता मुंबईला पाठविण्यासाठी त्यांचे कुटुंबीय तयार नव्हते. त्यांची एकूण अवस्था पाहिली तर जगताप यांच्या आरोग्यावर अधिकचा ताण येईल, अशी कुटुंबीयांची भूमिका होती. मात्र, पक्षादेश असल्याने आपण मतदानाला जाणार असे जगताप यांनी स्पष्ट केले. त्यानुसार ते पुण्याहून मुंबईला रवाना झाले.
'प्रकृती ठीक असेल तरच या' : आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, एअर ॲब्युलन्सच्या माध्यमातून मुंबईला जाण्याचा आमचा विचार होता. मात्र, सातत्याने हवामान बदल होत असल्याने त्यांना महामार्गानेच मुंबईला जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार रस्ते मार्गे मुंबईला आलो. चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांनी आम्हाला प्रकृती ठीक असेल तरच या, असे सांगितले होते. आम्ही लक्ष्मण जगताप यांना निरोप दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत पक्षाला माझी गरज असून, मी प्रवास करु शकतो, असे सांगितले. तसेच निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असेही शंकर जगताप यांनी सांगितले.
हेही वाचा - 285 MLA Cast Vote Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी 285 आमदारांनी केले मतदान