मुंबई - विधान परिषद निवडणुकीच्या ( Legislative Council Election ) मतदानाची तारीख जसजशी जवळ येते आहे तसतसे आमदार म्हणून निवडून येण्यासाठी प्रत्येक पक्षाचे नेते प्रयत्न करीत आहेत. एरवी मुंबई लोकलची आठवणही नसणाऱ्या भाजप ( BJP ) नेत्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने लोकलचा प्रवासही करावा लागत आहे. भाजपाचे उमेदवार प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी बहुजन विकास आघाडीच्या मतांसाठी चक्क लोकल रेल्वेतून प्रवास केला आहे.
तिघांनी केला लोकलने प्रवास - गाड्यांचा ताफा, सुरक्षारक्षकांचा गराडा आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीतून वावरणाऱ्या माजी मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांना आता मतांचा जोगवा मागण्यासाठी चक्क लोकलने ही प्रवास करावा लागत आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत बहुजन विकास पक्षाची मते आपल्या उमेदवारांना मिळावीत यासाठी आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार महेश चव्हाण यांनी चक्क लोकल रेल्वेने प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान या तिघांनी या निवडणुकीत रणनीती कशाप्रकारे आखता येईल यावर खलबते केली. तथापि, जनतेमध्ये मात्र त्यांनी केलेल्या लोकलच्या प्रवासावरच चर्चा सुरू आहे.