मुंबई - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी आंदोलन करण्यात आले. राज्यभरात करण्यात आलेल्या या आंदोलनात जवळपास 4 हजार महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी पुण्यात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, चित्रा वाघ, प्रदेश सचिव अर्चना डेहनकर, प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकार आदींनी या आंदोलनात भाग घेतला.
मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा-
श्रीमती उमा खापरे म्हणाल्या की, सामाजिक न्याय सारखे खाते सांभाळणारे धनंजय मुंडे हे स्वत:हून नैतिक जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. महिलांचा आदर ठेवून सन्मानाविषयी बोलणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुंडेंचा राजीनामा घेतील, अशी सुद्धा अपेक्षा होती. मात्र त्यांनी सुद्धा त्यांना अभय दिले आहे. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी आमची मागणी आहे.
राज्यभरातील जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी आंदोलन-
विदर्भामध्ये नागपूर, अमरावती शहर- ग्रामीण, बुलडाणा, उत्तर महाराष्ट्रमध्ये नाशिक व जळगाव, पालघर जिल्ह्यातील वाडा, ठाणे, रायगड, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, सातारा, लोणावळा मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, जालना तसेच राज्यभरातील जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी हे आंदोलन झाले. महिला मोर्चाच्या सर्व प्रदेश व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला.
हेही वाचा- तृतीयपंथीयांसाठी सोन्याचा दिवस, अंजली पाटील यांंनी ग्रामपंचायत निवडणुकीत मारली बाजी