मुंबई - महापौर किशोरी पेडणेकर आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत भाजपा नेते किरीट सोमैया यांनी या दोघांविरोधात मुख्यमंत्री व संबंधित प्रशासनाला तक्रार करून देखील कारवाई झाली नाही. त्यामुळे सोमैया यांनी आज मुंबईत पोलीस ठाण्यात तक्रार केलेली आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेकायदेशीरपणे एसआरएमध्ये जागा मिळवली व खोट्या कंपन्या स्थापन करून पालिकेची लूट केली. तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांनी वांद्रे येथील म्हाडाची जागेवर अनधिकृतपणे विकास केल्याचा आरोप किरीट सोमैया काही दिवसांपासून करत आहे आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री व एसआरए प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. मात्र 15 दिवस उलटून गेल्यानंतर ही कारवाई न झाल्याने काल किरीट सोमैया यांनी महापालिकेबाहेर आंदोलन करत चौकशी व कारवाई करण्याची मागणी केली होती. पण कारवाई न झाल्याने यानंतर आज सोमैया यांनी पोलीस ठाण्यात महापौर पेडणेकर व मंत्री परब यांच्याविरोधात लेखी तक्रार पोलीस ठाण्यात दिलेली आहे.
हेही वाचा - राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील अशी परिस्थिती, चंद्रकांत पाटलांचा दावा
महापौरांनी गरीब झोपडपट्टीवासियांसाठी असलेली एसआरएची जागा बळकावून तेथे मुलाची नियमबाह्य कंपनी स्थापन करणे, एकाच पत्त्यावर अनेक बोगस कंपन्या स्थापन करून शासनाची फसवणूक करणे आणि पदाचा गैरवापर करून नातेवाईकांना महापालिकेची कंत्राटे मिळवून देणे असे प्रकार केले आहेत. तसेच, मंत्री परब यांनी वांद्रे येथील कार्यालयासमोर अनधिकृत बांधकाम केलेले आहे, असे आरोप करत सर्व पुराव्यांनिशी सोमैया यांनी याबाबत म्हाडा व मुख्यमंत्र्यांना तक्रार देऊनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे पुढे कायद्यानुसार या दोघांवर कारवाई व्हावी, यासाठी आज भारतीय दंड विधान कलम 420, 468, 467, 471 अंतर्गत निर्मलनगर पोलीस स्टेशन, वांद्रे पूर्व इथे तक्रार नोंदवली असल्याचे किरीट सोमैया यांनी सांगितले.
हेही वाचा - कंगना प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेवर ताशेरे