मुंबई - राज्यात सध्या शिवसेना आणि भाजपा ( Shivsena BJP Dispute ) या दोन्ही पक्षात राजकीय वाद सूरु आहे. महापालिकेतही असाच वाद होत होता. मात्र, मुंबई महापालिकेवर प्रशासक नियुक्त ( Administrator For BMC ) केल्यावर भाजपा पालिकेत शांत झाली होती. मात्र, आता पुन्हा भाजपा आक्रमक भूमिका घेणार आहे. यामुळे पालिका प्रशासन, प्रशासक असलेले आयुक्त आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. मुंबई मनपात झालेल्या घोटाळ्याची माहिती गोळा केली जात असून हे सर्व प्रकार लवकरच पत्रकार परिषद घेऊन उघड केले जाणार आहेत, अशी माहिती पालिकेतील भाजपाचे पक्ष नेते विनोद मिश्रा ( BJP Leader Vinod Mishra ) यांनी दिली आहे.
शिवसेनेविरुद्ध भाजपा आक्रमक - मुंबई महापालिकेत 25 वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. या काळात शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकत्र होते. मात्र 2017 च्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष वेगळे लढले होते. त्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली. प्रत्येक प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधारी शिवसेनेला जेरीस आणले. कोविड काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपाने वेळोवेळी आंदोलने केली. कोरोना रुग्ण कमी झाल्यावर पालिकेच्या बैठका ऑनलाइन ऐवजी प्रत्यक्ष घ्याव्यात यासाठी, भाजपाच्या गटनेत्याला विरोधी पक्ष नेते घोषित करावे यासाठी भाजपाने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेले होते.
आयुक्तांनाही घ्यावी लागली दखल - मुंबई महापालिकेची 2017 मध्ये निवडणूक झाली होती. पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने पालिका बरखास्त करून 8 मार्चपासून प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. पालिकेच्या 7 मार्चच्या स्थायी समितीच्या बैठकीपर्यंत भाजपाने विरोध केला. आयुक्तांच्या कार्यालयाबाहेरही ठिय्या आंदोलन केले. भाजपाच्या पक्ष स्थापना दिनाच्या निमित्ताने सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी नालेसफाईच्या कामाची पाहणी करून त्याचा अहवाल पालिका आयुक्तांना दिला होता. याची दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी पालिका आयुक्तांना नाले सफाईची पाहणी करावी लागली होती.
पुन्हा आक्रमक होणार - नालेसफाईची पाहणी केल्यानंतर पालिकेत भाजपा शांत झाली होती. मात्र, मुंबई आणि महाराष्ट्रात आक्रमक होती. आता पुन्हा पालिकेकडून देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत भाजपाकडून कागदपत्रे काढण्यात येत आहेत. कोणती कंत्राटे जास्त दराने देण्यात आली आहेत. कोणत्या कंत्राटात भ्रष्टाचार दिसत आहे याची माहिती गोळा केली जात आहे. हे सर्व प्रकार लवकरच पत्रकार परिषद घेऊन उघड केले जाणार आहेत, अशी माहिती पालिकेतील भाजपाचे पक्ष नेते विनोद मिश्रा यांनी दिली आहे.