मुंबई - क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असताना आता दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचे भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैया यांनी ट्विट करून सांगितले आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात अखेर जामिनावर तुरूंगातून सुटका झाली असली तरी आता किरीट सोमैया यांच्या ट्विटने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर पडणार असल्याचे समजते.
हेही वाचा - मूळ विषयाला बगल देण्यासाठीच समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर चिखलफेक - किरीट सोमैया
काय आहे ट्विटमध्ये?
महाविकास आघाडीमधील ३ मंत्र्यांचे व त्यांच्या ३ जावयांचे अशा एकूण ६ नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचे सोमैया यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे. या पूर्वी शिवसेनेचे मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, आमदार रवींद्र वायकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, सचिव मिलिंद नार्वेकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री छगन भुजबळ यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे सोमैया यांनी उजेडात आणली व त्यांच्या मागे राष्ट्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला आहे. परंतु आता सोमैया यांनी अजून ६ नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सांगून याप्रकरणी ही लढाई चालू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
नवाब मलिक टार्गेटवर
क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या बचावासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करत असताना, महाविकास आघाडीतील नेते मुख्यतः नवाब मलिक हे सातत्याने समीर वानखडे व त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप करत आहेत आणि म्हणूनच आता नवाब मलिक यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्याची महत्त्वाची जबाबदारी सोमैया यांच्यावर असल्याचे समजत आहे.
हेही वाचा - भाजप नेत्याने आदिवासी महिलेला डांबून ठेवले होते, मंत्री नवाब मलिक यांचा नवा आरोप
अधिवेशनात तापणार मुद्दे
किरीट सोमैया व भाजपा नेते मोहित कंबोज हे आतापर्यंत नवाब मलिक यांच्यावर आरोप करत आले आहेत व त्याला नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात या सर्व आरोपांना उत्तर देणार असे म्हटले आहे. आता येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे तापणार हे नक्की.
आरोपांवर काय म्हणाले होते नवाब मलिक?
माझ्यावर भाजपाच्या एका नेत्याने बदनामीचा दावा ठोकण्याची तयारी सुरू केली. भाजपाने माझा ब्रँड १०० कोटींचा केला आहे. सगळे विकले गेले तरी माझ्याकडे १०० कोटी होणार नाहीत. मला भंगारवाला बोलत आहेत, त्यांना माहीत नाही भंगारवाला काय असतो. होय मी भंगारवाला आहे. माझ्या वडिलांनी मुंबईत कपडे व भंगाराचा व्यवसाय केला. मी आमदार होईपर्यंत भंगाराचे काम करत होतो. मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे, असे मलिक यांनी विरोधकांना सुनावले आहे.