मुंबई - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सात ( ED Raid Anil Property ) मालमत्तांवर आज ( 26 मे ) ईडीने छापे टाकले आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यावर आता भाजपा नेते किरीट सोमैयांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लवकरच अनिल परब तुरुंगात जातील. सोबत आणखी चार नेत्यांचा आता क्रमांक लागेल, असा दावा सोमैयांनी केला ( Kirit Somaiya On Anil Parab Ed Raid ) आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
किरीट सोमैया म्हणाले की, अनिल परब यांनी मनीलाँड्रिंग केल्या प्रकरणी मी ईडीकडे तक्रार केली होती. त्यानुसार आता ईडीने कारवाई केल्याचे दिसत आहे. अनिल परब यांनी दापोली येथे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून रिसॉर्ट उभारले होते. या रिसॉर्टसाठी त्यांनी 25 कोटी रुपये रोख रक्कम वापरली होती. तर सात कोटी रुपये धनादेशाद्वारे देण्यात आले होते. मात्र, या सगळ्याची त्यांच्या कुठेही खात्यात नोंद नाही. त्यामुळे हा सर्व पैसा मनीलाँड्रिंगच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला आहे, असा आरोप मी केला होता. त्यानुसारच आता कारवाई होत आहे. अनिल परब यांचे सीए सदानंद कदम यांनीच ही माहिती ईडीला दिल्याचेही सोमैयांनी सांगितले आहे.
आणखी चौघांचा लवकरच नंबर - दरम्यान, ईडीची कारवाई सुरू आहे. आता हसन मुश्रीफ, श्रीधर पाटणकर, नंदकिशोर चतुर्वेदी आणि यशवंत जाधव यांचीही लवकरच ईडीमार्फत चौकशी होऊन, त्यांनाही तुरुंगात पाठवल्या शिवाय राहणार नाही, असा दावाही किरीट सोमैयांनी यावेळी केला आहे.
सोमैयांनी आतापर्यंत कुणावर केले आरोप? - किरीट सोमैयांनी गेल्या काही वर्षांपासून विविध नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्याबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आतापर्यंत त्यांनी कोणत्या नेत्यांवर आरोप केले याबाबत जाणून घेऊया.
अजित पवार - किरीट सोमैयांनी मार्च 2016 मध्ये अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा प्रश्न आरोप केले होते. 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा पवार जलसंपदा मंत्री असताना झाल्याचा ठपका आरोप सोमैयांनी केला होता. त्यानंतर आता जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यात सहभाग असल्याचा दावा सोमैयांनी केला आहे.
अशोक चव्हाण - राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात आदर्श गृहनिर्माण सोसायटीमधील घोटाळा उघडकीस आणला होता. या घोटाळ्याप्रकरणी नोव्हेंबर 2010 मध्ये चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला.
छगन भुजबळ - राज्याचे तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामामध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच, भुजबळ यांनी आर्मस्ट्रॉंग कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी सुद्धा बनावट असल्याचा आरोपही भुजबळ यांच्या विरोधात केला होता.
नारायण राणे - विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातही यापूर्वी किरीट सोमैयांनी आरोप केले होते. राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप केला होता राणे यांचे नीलम हॉटेल आणि ग्रुप ऑफ कंपनीमध्ये शेकडो कोटी रुपयांचे गैरव्यवहार असल्याचा आरोप सोमैयांनी केला होता.
प्रताप सरनाईक - शिवसेनेचे आमदार आणि विहंग ग्रुपचे मालक प्रताप सरनाईक यांच्या विरोधात 250 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केली सोमय्या यांनी केला आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांनीही शंभर कोटींचा मानहानीचा दावा सोमैयाविरोधात ठोकला आहे.
भावना गवळी - शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेमध्ये शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमैयांनी केला आहे. ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणीही सोमैयांनी केली आहे.
मिलिंद नार्वेकर - शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता कोकणात समुद्रकिनारी बंगला बांधल्याचा आरोप सोमैयांनी केला आहे.
हसन मुश्रीफ - मंत्री हसन मुश्रीफ या आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 127 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सोमैयांनी केला आहे. साखर कारखाने आणि विविध संस्थांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमैयांचा आहे.
श्रीधर पाटणकर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांनी 11 सदनिका गैरव्यवहारातून उभ्या केल्या असल्याचा आरोप किरीट सोमैयांनी केला आहे.
नंदलाल चतुर्वेदी - आदित्य ठाकरे यांनी त्यांचे सीए नंदलाल चतुर्वेदी यांच्याकडून सात कोटी रुपयांचं बेहिशेबी व्यवहार केल्याचा आरोप किरीट सोमैयांनी केला आहे.