मुंबई - भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत त्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. कोविड सेंटर येथील जागेबाबत गैरव्यवहार झाल्याचे काही पुरावे त्यांनी सादर केले होते. मात्र, यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे महापौरांच्याविरुद्ध जनहित याचिका दाखल केल्याची माहिती सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - किरीट सोमैया गिधाडासारखा पेपर घेऊन फडफडतोय, ही त्यांना शेवटची वॉर्निंग - संजय राऊत
महापौरांविरोधात सबळ पुरावे सादर करूनही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा दावा सोमय्या यांनी केला. त्यामुळे आम्ही जनहित याचिका दाखल केली आहे, आम्ही कोर्टासमोर आता आमची बाजू मांडू, दोषांना दंड घडवून आणू, असे ते म्हणाले. दिवाळीनंतर त्याचा निकाल येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंचे सरकार भूखंडाचे श्रीखंड बनवते -
गरीब झोपडपट्टी वासियांसाठी बांधण्यात आलेले अर्धा डझनहून अधिक गाळे बेकायदेशीर आणि अपारदर्शक पद्धतीने बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच ही मालमत्ता स्वतःच्या परिवारातील कंपनीच्या ताब्यात ठेवण्याचा आरोप त्यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केला. याबाबत न्यायालयात पुरावे सादर केले आहेत, असे सोमय्या म्हणाले. ठाकरे सरकारचे तीन घोटाळे बाहेर काढीन, असं मी जनतेला वचन दिलं होतं. आणि मी ते केलंय, असे सोमय्या म्हणाले. उद्धव सरकारला 1 वर्ष पूर्ण होईल, तेव्हा देखील अजून 3 घोटाळे पुराव्यनिशी बाहेर काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वीच युद्धपातळीवर तयारी; सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले 'हे' आदेश
फ्रॉडला समानार्थी शब्द म्हणजे किरीट सोमय्या -मुंबई महापौर
शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईच्या महापौरांवर भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी पुन्हा तोफ गाडली आहे. याला प्रत्युत्तर देताना महाभारतात जसे शिखंडीच्या मागून लढाई केली जात होती, तशीच भाजप करत असून सोमय्या हे शिखंडीची भूमिका बजावून आरोप करत आहेत, अशी तिखट प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. सोमय्या यांनी मी एसआरएची घरे लाटल्याचा तसेच घरातल्यांना पालिकेचे कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप केला आहे. मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. ते कोर्टात गेले आहे. त्यामुळे कोर्टात काय ते सिद्ध होईल. वारंवार तक्रारी करायच्या, लोकांना त्रास द्यायचा, आवाज करायचं एवढंच त्यांचं काम आहे असेही महापौर म्हणाल्या.
किरीट सोमय्यांना शेवटची वॉर्निंग - संजय राऊत
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला चढवला. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचे प्रकरण हे वेगळे आहे. आमच्या मराठी भगिनीचं कुंकू पुसलं गेलं. ते अनेक महिन्यांपासून न्यायाची मागणी करत आहेत. त्यावर शेठजींच्या पक्षाचे व्यापारी प्रवक्ते काहीही बोलायला तयार नाहीत. २०१४ सालचे हे जमिनीचे कायदेशीर व्यवहार आहेत. २१ व्यवहार केले आहेत. ते दाखवावेत, हा खोटारडेपणाचा कळस आहे. मराठी माणसांनी व्यवहार केले, ते डोळ्यात खुपतंय का? किरीट सोमैयांनी कितीही फडफड केली तरी, त्यातून काही निष्पन्न होणार नाही.
शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ -शिवसेना प्रवक्ते
किरीट सोमय्या हे वारंवार मुख्यमंत्री, शिवसेना व शिवसेना नेत्यांवर आरोप करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना त्यांची आरोपांची मालिका संपली की आम्ही त्या आरोपांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असे परिवहन मंत्री व शिवसेना प्रवक्ते अनिल परब यांनी म्हटले आहे. त्यांना आरोप करण्याचे काम दिलेले आहे. त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघितल्यास आता पर्यंत केलेल्या आरोपामधील एकही आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यांच्या आरोपाची मालिका पूर्ण होऊ दे, दिवाळीचे दोन चार दिवस जाऊ देत त्यानंतर आम्ही त्या आरोपांची शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ.
भाजप आणि किरीट सोमय्या यांनीही पातळी गाठली- काँग्रेस प्रवक्ते
अन्वय नाईक प्रकरणी भाजपाने आरोपीला पाठीशी घालण्याचे काम यापूर्वीही केले आहे आणि आताही करत आहे. किरीट सोमय्यांनी ज्या जमिनीच्या व्यवहारावर बाऊ सुरू केला आहे, त्या जमिनीचा व्यवहार हा अन्वय नाईक व त्यांच्या हयातीमध्ये झाला होता. परंतु भाजप आणि सोमय्या यांनी हे जमीन व्यवहार झाले ते काढून दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, या माध्यमातून त्यांनी या प्रकरणात हीन पातळी गाठली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.