मुंबई - कोरोनाच्या रुग्णांची संख्या सध्या कमी होत असल्याचा सरकारकडून दावा करण्यात येतो. रुग्णालयात रुग्णांची व्यवस्था करण्यात पालिका व राज्य सरकारची यंत्रणा गुंतलेली असताना एकीकडे मुंबईत वाढत्या कोरोनाबळींमुळे मृतदेहांवरील अंत्यसंस्काराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. करोनामुळे मृत झालेल्यांचे मृतदेह विद्युतदाहिनीतच जाळावे लागत असल्यामुळे काही स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी दहा ते सोळा तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे कोरोना मृत्यूंचा कहर अजूनही असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मोठ्याप्रमाणात येत असल्यामुळे ताण वाढल्याने मरीनलाईन्स, कांदिवली, भांडुप आणि घाटकोपर स्मशानभूमीत रांगांच रांगा लागल्या आहेत. विद्युतदाहिनीत काही दिवसांपूर्वी बिघाड झाला होता. विद्युतदाहिनीची सोय असलेल्या ठरावीक स्मशानभूमीत गेल्या काही दिवसापासून मोठ्या संख्येने मृतदेह रुग्णवाहिकेतून आणले जात आहेत. कोरोनाबाधिताचा मृतदेह विद्युतदाहिनीतच जाळावा लागतो. त्यामुळे ज्या स्मशानभूमीत विद्युतदाहिनी किंवा गॅसदाहिनी आहे, अशा ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा यासाठी आम्ही व्यवस्था करत आहोत आहे, असे प्रशासनानाकडून सांगण्यात आले होते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून स्मशानात रांगाच रांगा ही परिस्थिती जैसे थे आजही आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबई सध्या कमी होत आहे आणि मृत संख्या देखील कमी होत आहे, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. पण स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी रांगाच रांगा पाहता, मुंबईत कोरोनाचा कहर आजही आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
स्मशानभूमीत मृतांना जाळण्यासाठी रांगाच रांगा लागत असल्यामुळे मृताच्या नातेवाईकांना मोठ्या समस्यांना आणि त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्मशानभूमीत प्रशासनाने व सरकारने योग्य ती उपाययोजना करावी, अशी विनंती सोमय्या यांनी केली आहे.