मुंबई - कोरोना काळात देशावर इंधन दरवाढीचं संकट गडद होत चालंलं आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती आधीच खालावली आहे. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेल दरवाढ सातत्याने सुरू असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. देशभरात विविध ठिकाणी आज काँग्रेसकडून इंधन दरवाढीबाबत केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले आहे. हे आंदोलन नौटंकी, बेगडी असल्याची टीका महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केली आहे.
काय म्हणालेत महाराष्ट्रातील भाजपनेते काँग्रेसच्या आंदोलनावर
काँग्रेस पक्षाचे जनआंदोलन ही नौटंकी - राम कदम
काँग्रेसचे आजचे आंदोलन म्हणजे दुतोंडीपणा आहे. पेशंटची होणारी लूटमार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा माल अजूनही घरातच पडून आहे. तो सरकारकडून उचलला न जाणे, वादळामुळे नुकसानग्रस्त कोकणाला अजूनही महाविकास आघाडीकडून काहीही मदत न करणे, त्याबाबतीत काँग्रेस कधी आंदोलन करणार? असा प्रश्न भाजपनेते रामकदम यांनी काँग्रेसला विचारला आहे.
काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधातील आंदोलन हे बेगडी - देवेंद्र फडणवीस
पेट्रोल-डिझेलचे दर आता कंपन्यांच्या हाती आहेत. ते सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय काँग्रेसच्या राजवटीत झाला. इंधन हे जीएसटीच्या कक्षेत नसल्याने त्यावर व्हॅट आकारला जातो. 2018 साली अशीच वेळ आली होती, तेव्हा आपल्या सरकारने 5 रूपयाने दर केला होता. राज्य सरकारने अर्थसंकल्पात 1 रूपये आणि आता 2 रूपये व्हॅट वाढविला. एकूण 3 रूपये राज्य सरकारने वाढविले. त्यामुळे काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधातील आंदोलन हे बेगडी असल्याची टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
काँग्रेसला पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही - आशिष शेलार
आपल्या देशातील तेलाचे भाव ठरवण्याचा निर्णय मागील काँग्रेस सरकारच्या काळात झाला. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव जसे वाढतात, तसे आपल्या देशातील भाव वाढत आहेत. ही बाब आम्ही नम्रपणे जनतेपर्यंत पोहोचत आहोत. काँग्रेसच्या काळात हा निर्णय झाल्यामुळे आता काँग्रेसला या भाव वाढीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ते केवळ राजकारण करीत आहेत. जर त्यांना जनतेची एवढीच काळजी असेल तर मग महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलवर आकारलेला कर त्यांनी माफ करावा. त्यांनी कर लावल्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल महाग झाले आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर भाजप नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी दिली.