मुंबई - दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त लाखो चाकरमानी कोकणात त्यांच्या मूळगावी जातात. यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने चाकरमान्यांना कोकणात सोडण्यासाठी आवश्यक परिवहन कसे उपलब्ध करायचे, अशा प्रश्न सरकारसमोर आहे. याबाबत मंत्र्यांच्या बैठका होत असल्या, तरिही अद्याप संभ्रमाची स्थिती आहे. त्यामुळे भाजपा नेते अशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. कोकणात गाड्या सोडण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निवेदन त्यांनी दिले आहे.
चाकरमान्यांना गणेशोत्सवादरम्यान गावी जाण्याबाबत सरकारने वेळीच निर्णय घ्यावा, अन्यथा लालबागच्या राजाप्रमाणे गणेश भक्त आणि बाप्पाची ताटातूट होईल, असे शेलार म्हणाले. गणेशोत्सवासाठी काहीच दिवस शिल्लक असतानाही अद्याप कोणताही निर्णय सरकारकडून घोषित करण्यात आलेला नाही. यामुद्यावर त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
![ashish shelar speaks](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_24072020151210_2407f_1595583730_110.jpg)
बहुसंख्य ग्रामपंचायतींनी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंन्टाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उपलब्ध साधने आणि निधीचा विचार करून हा निर्णय घेतला. मात्र जागा, वैद्यकीय सुविधांचा अभाव ग्रामपंचायतींना सहन करावा लागत आहे. राज्य सरकारने अन्न, गरम पाणी, शौचालये, औषधांसाठी विशेष निधी ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिलेला नाही. सरकारने याबाबत साधा विचारही केलेला नाही. यातून ग्रामस्थ आणि चाकरमान्यांमध्ये दरी निर्माण झाली असून याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे.
क्वारंन्टइन व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, बसेस, ट्रेनची सोय, टेस्टींग, इ. यांसारखे अनेक मुद्दे अशिष शेलार यांच्या पत्रात अंतर्भूत आहेत.