मुंबई - मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी सादर झाला. या अर्थसंकल्पात पालिकेने मेट्रो, कोस्टल रोड, पर्यटन स्थळांचा विकास या सारख्या पायाभूत सुविंधावर भर दिला आहे. मात्र, या अर्थसंकल्पावरून भाजपानेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. रिकाम्या तिजोरीचा नुसता खडखडाट, कारभाऱ्यांचा उगाच बाजीरावांचा थाट अशा शब्दात सत्ताधारी शिवसेना आणि पक्ष प्रमुखांवर शेलार यांनी ट्विटरवरून निशाणा साधला आहे.
'रिकाम्या तिजोरीचा नुसता खडखडाट-
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर टीका करताना शेलार यांनी म्हटले आहे की, कारभाऱ्यांची कोणतीही चमकदार कामगिरी नसलेला. धनदांडग्यांना केलेल्या सवलतींच्या वर्षावामुळे 5 हजार 867 कोटी महसूलात घट असलेला हा अर्थसंकल्प आहे. पालिकेला 5 हजार 876 कोटींने कर्जबाजारी करणारा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे 'रिकाम्या तिजोरीचा नुसता खडखडाट, अन कारभाऱ्यांचा उगाच बाजीरावांचा थाट अशा शब्दात पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला टोला लगावला आहे.
उड्डाणपूलांचे सौंदर्यीकरण म्हणजे जागतीक दर्जाच्या सुविधा असतात काय?
शिवसेना एकीकडे बुलेट ट्रेनला विरोध करत आहे. तसेच मेट्रोच्या कारशेडचा खेळखंडोबा केला आहे. कारभारी नव्या प्रत्येक प्रकल्पांना विरोध करणार आणि पालिका म्हणते, आम्ही मुंबईकरांना जागतिक दर्जाच्या नागरी सुविधा देणार, चौकांचे आणि उड्डाणपूलांचे सौंदर्यीकरण म्हणजे जागतीक दर्जाच्या सुविधा असतात काय? असा सवाल करत शेलार यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
पालकमंत्र्यांचे बालहट्टांचे घोषणापत्र?
कमी व्याजावर 77,000 कोटींच्या ठेवी बँकेत ठेवून बँकाना पैसा वापरायला देणारी महापालिका दुसरीकडे कर्ज काढून चढ्या दराने व्याज भरणार, एकिकडे महसूलात घट , कर्ज घेणार सांगणारी महापालिका म्हणतेय अर्थसंकल्पाचे आकारमान 16.74 % वाढणार. फसलेला ताळमेल अन् सगळा आकड्यांचा खेळ. करात वाढ नसली तरी शुल्क आकार सुधारणा प्राधिकरण घोषित करून शुल्क वाढीच्या नावाने खिसा कापण्याचे सूतोवाच आहेच. समुद्राचे पाणी गोडे करणे, वरळी डेरीवर जागतिक पर्यटन केंद्र उभारणे. हे सारे पाहिले की हा पालिकेचा अर्थसंकल्प होता की, पालकमंत्र्यांचे बालहट्टांचे घोषणापत्र? आहे, अशा शब्दांत आमदार अँड आशिष शेलार यांनी अर्थसंकल्पाचा समाचार घेतला आहे.