मुंबई - अंडरवल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांशी थेट आर्थिक व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, देव, देश आणि धर्मासाठी आता बोलून नाही तर करून दाखवा, शिवाय मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या दबावाखाली झुकू नये, असे जाहीर आवाहन भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. अन्यथा भाजपा आंदोलन अधिक तिव्र करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'शरद पवार यांच्या दबावासमोर झुकू नये'
गेले काही दिवस राज्यातील मंत्री आणि पीएमएलए कायद्या अंतर्गत आरोपी असलेले आणि ईडीने अटक केलेले मंत्री नवाब मलिक यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्री मंडळातून हकालपटृी करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपा करत आहे. मुख्यमंत्र्यांनी देशहितासाठी ताठ मानेने उभे रहावे, मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दबावासमोर झुकू नये, झुंकेगे नही हे आता बोलण्यासाठी नाही, तर करून दाखवण्याची ही वेळ आहे, असेही आमदार आशिष शेलार म्हणाले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मर्जीतील पोलीस आयुक्त नियुक्त केले आहेत. त्यामुळे थेट पोलीस आयुक्तांना आदेश द्यावेत, दाऊद, हस्तक आणि त्यांचा राजकीय वरदहस्त असलेल्या नवाब मलिक यांच्या सारख्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.
'केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावे'
केंद्रीय तपास यंत्रणा देशहितासाठी जो तपास करत आहेत त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने सहकार्य करावे, देव, देश आणि धर्मासाठी हे जे ते बोलत असतात ते आता करून दाखवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी कुणासमोर ही झुकू नका, भाजपा आपल्याला या मुद्यावर सर्व राजकीय मुद्दे बाजूला ठेवून समर्थन देईल, असेही त्यांनी सांगितले. तीन पक्षांमध्ये अपेक्षा करावा कसा एकच पक्ष असून म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. ते याबाबत विचार करतील असा आम्हाला विश्वास आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निवेदन करावे, अशी मागणीही आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
'सरकारची न्यायीक भूमिका कोणती आणि प्राथमिकता कोणती?'
राज्यातील आघाडी सरकारची प्रथमिकता कोणती आणि न्यायीक भूमिका कोणती ? हे कळायला मार्ग नाही. मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले तर त्यांचा राजीनामा घेण्यात आला. तर त्यापेक्षा भयंकर आरोप नवाब मलिक यांच्यावर झाले, पण त्यांचा राजिनामा घेतला जात नाही. आझाद मैदानात आमचे छत्रपती संभाजी राजे उपोषणाला बसले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडेपर्यंत सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्यासाठी टाहो फोडायला सगळे मंत्री मंडळ एकवटले, एकीकडे छत्रपती संभाजी राजेंकडे लक्ष दिले जात नाही. पण नवाब मलिक यांना औषधोपचार योग्य होईल, म्हणून काळजी घेतली जाते. हे ठाकरे सरकर आडनावे बघून भूमिका घेते का? काही विशिष्ट समाजातील विशिष्ट आडनावाच्या माणसांची विशेष काळजी सरकार घेते का? दाऊद, इक्बाल कासकर, हसिना पारकर, जावेद फ्रुट, सरकार शहावली खान, छोटा शकिल अशी नावे आली म्हणून तुम्ही या चौकशा थांबवा असे म्हणताय का? असा सवालही आमदार आशिष शेलार यांनी केला.