मुंबई - दोन वर्षांपूर्वी जोगेश्वरीतील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान काही नागरिकांना पूर्णत: किंवा अंशत: अंधत्व आले. अद्यापही या पीडितांना पालिका प्रशासनाने जाहीर केलेली मदत मिळालेली नाही. या पीडितांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने 20 लाख रुपयांची भरपाई तसेच पीडितांच्या कुटुंबातील एकाला महापालिका सेवेत सामावून घ्यावे, अशा स्वरूपाची मदत तातडीने करावी. तसेच त्यांच्या आयुष्यातील अंधार कायमचा संपवावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे सुधार समिती सदस्य अभिजीत सामंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
20 लाख देण्याचा प्रस्ताव मंजूर -
2019 मध्ये जोगेश्वरी पूर्व येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान काही नागरिकांना पूर्णत: किंवा अंशत: अंधत्व आले. ही धक्कादायक बाब 23 जानेवारी 2019 रोजीच्या स्थायी समितीमध्ये तत्कालीन स्थायी समिती सदस्य अभिजित सामंत यांनी उघडकीस आणत प्रशासनाला संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानंतर झालेल्या फेब्रुवारी 2019 च्या महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या पिडीत नागरिकांना 20 लाख रुपये भरपाई व त्यांच्या कुटुंबातील एकाला महापालिका सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन महापौरांनी याबाबतचे निर्देश प्रशासनाला दिलेले होते. या अपघातात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्यानंतर झालेल्या जंतूसंसर्गाने तीन जणांनी दृष्टी गमावली, तर चारजणांची दृष्टी अंधुक झाली. हे सर्व नागरिक सध्या रोजगाराविना आहेत. त्यात एक पिडीत रुग्ण टेम्पोचालक तर एकजण रिक्षाचालक असून इतर दोन महिला उदरनिर्वाहाकरिता कुटुंबीयांवर अवलंबून आहेत.
20 लाख नुकसान भरपाई द्या -
दुर्दैवाने ही घटना अशा हॉस्पिटलमध्ये झाली आहे, ज्याला आपण सर्वांना आदरणीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेले आहे. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयात लक्ष घालत पालिका प्रशासनाला सक्त आदेश देऊन फेब्रुवारी 2019 च्या सभेत संमत झालेल्या ठरावानुसार 20 लाख नुकसान भरपाई तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस महापालिका सेवेत सामावून घ्यावे. तसेच या दीपावलीमध्ये पिडीत रुग्णांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य प्रकाशमान करावे अशी मागणी सामंत यांनी केली आहे.