मुंबई- महापुरुषाचा समाज माध्यमात अवमानकारक फोटो प्रसिद्ध करणे भाजपच्या नगरसेविकेला भोवले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विवादित छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित केल्याबद्दल भाजपच्या नगरसेविका सुरेखा पाटील यांना अटक करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांच्या समता नगर पोलिसांकडून सोमवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी सुरेखा पाटील यांच्या समाज माध्यमांवरील फेसबुक पेजवर काही छायाचित्र प्रसारीत करण्यात आली होती. मात्र, यातील काही छायाचित्र मॉर्फ करून त्याचे विद्रुपीकरण करण्यात आले होते. हे लक्षात आल्यानंतर सुरेखा पाटील यांनी ही छायाचित्र त्यांच्या फेसबुक पेजवरून काढून टाकलेली होती.
हेही वाचा-वाढवणच्या समुद्रकिनारी 'फ्लाईंग फिश'चे दर्शन
आक्षेपार्ह पोस्टबद्दल नगरसेविकेकडून माफी-
भाजपच्या नगरसेविका सुरेखा पाटील या मुंबई महानगर पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 27 मधून निवडून आलेल्या आहेत. बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अंकुश जाधव यांनी त्यांच्या अवमानकारक पोस्टविरोधात समतानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून नगरसेविका सुरेखा पाटील यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, आपल्याकडून अनावधानाने ही चूक झाल्याचे सुरेखा पाटील यांनी मान्य केले. तसेच माफीसुद्धा मागितली आहे. दरम्यान, सुरेखा पाटील यांची 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
हेही वाचा-'गोलू'चा कोंबडबाजार अन् पोलीस प्रशासन गपगार; अवैध धंद्यातून दररोज कोट्यवधींची उलाढाल