मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगूल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग आला असून भाजपने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूक समिती यादी काल रात्री उशिरा मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी जाहीर केली आहे. यामध्ये आमदार आशिष शेलार यांच्याकडे निवडणूक संचलन समिती अध्यक्षपदाची जबाबदार सोपविण्यात आली आहे.
आशिष शेलार यांच्याकडे पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी -
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चेनंतर निवडणुकीच्या दृष्टीने २५ समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केल्या. निवडणूक संचालन समितीत खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, किरीट सोमय्या हे निमंत्रक असून आमदार राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर,नितेश राणे, प्रकाश मेहता हे सदस्य असतील.
![आमदार आशिष शेलार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ashishshelar-7210570_05022022090653_0502f_1644032213_315.jpg)
जाहीरनामा समिती अध्यक्षपदी खासदार पूनम महाजन -
जाहीरनामा समिती अध्यक्ष म्हणून खासदार पूनम महाजन यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणूक आधी आशिष शेलार यांच्याकडे पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपा आमदार योगेश सागर हे जाहिरनामा समितीचे सचिव असतील. या समितीत भाजप नेते सुनिल राणे, आर.यू. सिंह, राजहंस सिंह, प्रभाकर शिंदे हे सदस्य असतील.
![खासदार पूनम महाजन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ashishshelar-7210570_05022022090653_0502f_1644032213_809.png)
प्रविण दरेकर यांना प्रशासन समन्वयक -
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना प्रशासन समन्वयक म्हणून नेमण्यात आलं आहे. तर आमदार अतुल भातखळकर यांना प्रसार माध्यम व समाज माध्यम अध्यक्ष करण्यात आलं आहे. या समितीत भाजप नेते राम कदम, अमरजीत मिश्रा, विवेकानंद गुप्ता यांचाही समावेश आहे.
राजनाथ सिंग, नड्डा सह दिग्गजांचा सहभाग -
विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता ऐन रंगात आला असताना भाजपने आजपासून महाजनसंपर्क अभियान सुरू केले आहे, या अभियानाअंतर्गत आज शनिवार आणि उद्या रविवारी राज्यातल्या सर्व 40 मतदारसंघामध्ये भाजपचे राष्ट्रीय नेत्यांसह अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. येत्या आठवडाभरात गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, राजनाथ सिंह यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री या प्रचारात सहभागी होणार आहेत.
भाजपाची प्रचारात आघाडी
भाजपच्या सर्व उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून ते महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक घरांना भेटी देणार असून त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार आहेत..
शिवसेना ही आक्रमक -
राज्यात शिवसेनेच्या प्रचाराची जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्यासोबत आजपासून पुढील दोन दिवसात तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक आमदार आणि मुंबईतील अनेक नगरसेवक या प्रचारास गोव्यात दाखल झाले आहेत.