मुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचाराची (Bhima Koregaon violence) चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चौकशीसाठी समन्स (Summons to Sharad Pawar) बजावले आहे. येत्या 5 आणि 6 मे रोजी मुंबईत होणाऱ्या सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी आयोगाने पवारांना समन्स बजावला आहे. 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या चौकशीसाठी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या प्रकरणात शरद पवार यांनी यापूर्वी लेखी स्वरुपात साक्ष आयोगाला पाठवली होती. या प्रकरणात शरद पवार यांची साक्ष अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
या आधीही पवारांना आले होते समन्स - 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहणार होते. मात्र, काही कारणास्तव ते हजर राहू शकले नव्हते. 1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. पुणे जिह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला असला तरी राज्य सरकारतर्फे चौकशी आयोगाचे कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे सुरू केले.
हेही वाचा - Pawar's Attack on BJP : वेळ आल्यावर योग्य पद्धतीने समाचार घेऊ, शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल
प्रत्यक्ष आयोगासमोर साक्ष देण्यासाठी समन्स - भीमा कोरेगाव प्रकरणात यापूर्वी 23 आणि 24 फेब्रुवारीला साक्ष नोंदवण्यासाठी पवारांना समन्स दिला होता. मात्र, त्यावेळी शरद पवार काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे शरद पवार यांनी आयोगासमोर न जाता लेखी स्वरुपात साक्ष पाठवली होती. त्यानंतर आता पुन्हा आयोगाने प्रत्यक्ष आयोगासमोर साक्ष देण्याकरिता शरद पवार यांना समन्स पाठवले आहे.
आयोगाने अनेक अधिकारी, संघटनांची नोंदवली साक्ष - आयोगाने या प्रकरणात आतापर्यंत आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला, विश्वास नागरे पाटील यांच्यासह अनेक सामाजिक संघटनेच्या साक्ष नोंदवल्या आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणात चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून आयोगाची नेमणूक करण्यात आले होती. आता या प्रकरणात शरद पवार यांची देखील साक्ष नोंदवण्यात येणार आहे. शरद पवार यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भीमा कोरेगावात हिंसाचार भडकला असे वक्तव्य केले होते. या प्रकरणात अॅड. प्रदीप गावंडे यांनी शरद पवार यांची साक्ष नोंदविण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आयोगाने शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यासाठी समन्स पाठवला आहे.
नेमके प्रकरण काय - मराठा सेना आणि इस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमांतर्गत अनेक संघटना एकत्रितपणे करण्याचे आयोजन केले होते. पुण्याजवळ भीमा कोरेगावात 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी तिथे लाखोच्या संख्येने जनसमुदाय जमला होता. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील वक्तव्य कारणीभूत होते, अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला होता.