मुंबई - नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात योग्य बाजू मांडली नसल्यानेच आरोपींना न्यायालयीन कोठडी ठोठावल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे. त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकारने दिलेले विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांना त्वरित बदलण्याची मागणी भीम आर्मीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याबद्दल आणि राजा ठाकरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याबाबत भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांचे पत्र पाठवून अभिनंदन केले होते. या प्रकरणी सत्र न्यायलयात २८ मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान तक्रारदाराच्या बाजूने कामकाज पाहताना जेष्ठ वकील नितीन सातपुते यांनी डॉ. पायल तडवीची हत्या झाल्याची शक्यता व पोलीस तपास अपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे हेमा आहुजा, भक्ती मेहेर व अंकिता खंडेलवाल या तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती.
गुरुवारी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणाचा तपास अपूर्ण असून आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीची आवश्यकता असताना सरकारी वकील राजा ठाकरे यांनी आज न्यायालयात तक्रारदारांची बाजू भक्कमपणे मांडली नाही. त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडीऐवजी १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली. या आरोपींना आता जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यात आल्याचा दावा कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे विशेष सरकारी वकील त्वरित बदलून त्यांच्या जागेवर योग्य सक्षम व तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करावी, अशी मागणी भीम आर्मीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.