मुंबई- १९ जून २०२२ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ( Dr. Shyamaprasad Mukherjee ) यांनी देशाच्या अखंडतेसाठी ( integrity country ) प्राणांचे बलिदान दिले. त्यांनी 'एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे’ असे निक्षून सांगितले होते. मुखर्जी यांचे काश्मीरबाबतचे स्वप्न ( Dream about Kashmir ) पंतप्रधान मोदी यांनी सन २०१९ साली कलम ३७० रद्द ( Section 370 repealed ) करून साकार करून दाखवले. असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या ( Bharatiya Janata Party ) वतीने भारतीय जनसंघाचे अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते शनिवारी बोलत होते.
३७० वे कलम हे देशाला विघटनाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणारे? - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी प्रखर राष्ट्रभक्त होते. ते विद्वत्तापूर्ण, बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. संसद आणि बंगालमध्ये त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्याकडून तुष्टीकरणाचा प्रयत्न झाला त्यावेळी त्याला डॉ. मुखर्जी यांनी सातत्याने विरोध केला. प्रकांड बुद्धिमत्तेच्या श्यामाप्रसादजींनी राष्ट्रीय राजकारणावर अल्पकाळातच छाप उमटविली होती. नेहरू, लियाकत करारातून तुष्टीकरणाचा प्रयत्न होत असून यातून द्वेषाची बीजे रोवली जातील. असे, त्यांनी ठणकावून नेहरू यांना सांगितले होते. याकरिता त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ३७० वे कलम हे देशाला विघटनाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणारे आहे, याची जाणीव त्यांनी सरकारला वेळोवेळी करून दिली होती.
भाजपा 'जे बोलतो ते करतो - फडणवीस पुढे म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करण्यास राज्याबाहेरील नागरिकांना प्रवेश पत्र घेणे अनिवार्य करण्यात आले होते. कलम ३७० च्या विरोधात भारतीय जनसंघाने सत्याग्रह सुरू केला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमवेत जम्मू येथे निघाले असताना डॉ. मुखर्जी यांना अटक करण्यात आली. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. तिथेच त्यांचा संशयास्पद मृत्यु झाला. डॉ. मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच काश्मीर भारतात राहू शकला.
मुखर्जी यांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले - त्यानंतर ३७० व्या कलमाविरोधात देशभरात सातत्याने आंदोलने होत राहिली. डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी १९९१-९२ मध्ये या कलमाविरोधात देशव्यापी एकता यात्रा काढली होती. या यात्रेची सांगता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावून झाली. डॉ. मुखर्जी यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. भाजपा 'जे बोलतो ते करतो' असेही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे अभ्यासू व्यक्तिमत्व होते. ते आधी काँग्रेस आणि नंतर हिंदू महासभेत सामील झाले पण त्यांनी नेहमीच देशाला पुढे नेण्यासाठी आणि हिंदुत्वासाठी काम केले.
हेही वाचा -Agneepath Scheme: अग्निपथ'विरोधात काँग्रेस आक्रमक! राहुल गांधींच्या उपस्थितीत जंतरमंतरवर 'सत्याग्रह'