मुंबई - बंडखोर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दापोलीतील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बाप काढून अप्रत्यक्षपणे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले. शिवसेना यावरून आक्रमक झाली असताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनीही उद्धव ठाकरे वारंवार कितीवेळा बापाची कॅसेट लावणार, असे सांगत रामदास कदम यांची पाठराखण केली. बाळासाहेबांची खरी शिवसेना आम्ही असा, छातीठोक दावा करणाऱ्या शिंदे गटाला शिवसेनाप्रमुखांबाबत किती आदर आहे, हे यावरून स्पष्ट होते.
विकासकामाच्या निधीची बोंब - शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री असूनही भेट दिली जात नाही. विकासकामाच्या निधीची बोंब आहे. परिणामी मतदार संघातील कामे रखडली आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना पक्ष संपवण्याचा घाट घातला जातोय, असा आरोपांचा भडिमार करत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाऊ असा नारा दिला. सेनेच्या ४० बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले. गुजरात, आसाम आणि गुवाहाटी या भाजपशासित राज्यातून दौरा करुन महाराष्ट्रात भाजप सोबत शिंदे गटाने सत्ता स्थापन केली.
ठाकरे परिवाराबाबत एक ब्र सुद्धा काढणार नाही - राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेवर येताच शिंदे गटाचा सूर बदलला. एकेकाळी राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या शिंदे गटाने शिवसेना नेते संजय राऊत, विनायक राऊत यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली. दुसरीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिंदे गटाचा खरपूस समाचार घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे विरोधात बोलणार नसल्याची भूमिका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मांडली. मात्र, आता शिंदे गटाकडून थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर टीका सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरेंचा काढला बाप - शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेतून बंडखोरी केलेल्यांवर शिवसेना नेत्यांकडून जोरदार टीकास्त्र सुरू आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर रामदास कदम यांनी थेट भास्कर जाधव यांच्यावर टीका केली. त्यांची पातळी घसरली आणि त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बाप काढला. एकीकडे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातोय, असे सांगणाऱ्या शिंदे गटाकडून बाळासाहेबांवर शिंतोडे उडवण्यात आले. शिवसेनेचे नेत्यांकडून कदम यांचा खरपूस समाचार घेतला जातो आहे.
रामदास कदमांची पाठराखण - एकीकडे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो असे सांगायचे, दुसरीकडे थेट बाळासाहेबांवर संशयास्पद वक्तव्य करायचा प्रकार वाढीस लागला आहे. बंडखोर गटाचे आमदार भरत गोगावले यांना यावर विचारले असता, वारंवार कितीवेळा बाळासाहेब यांची कॅसेट लावायची. सगळ्यांना बाळासाहेबांच्या परिवाराबाबत माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सतत का सांगावं लागतंय, असा प्रश्न उपस्थित करत शब्द इकडचा तिकडे झाला असेल. त्याला एवढे मनावर घेण्याचे कारण नाही, असे सांगत अप्रत्यक्षपणे रामदास कदम यांची पाठराखण करताना सारवासराव करण्याचा प्रयत्न केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आपल्याला संपवत आहे. त्यामुळे शिंदे गटाला सोबत घेऊन ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची कास धरून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते असे गोगावले म्हणाले. शिवसेनेचे नेते मुख्यमंत्र्यांना अडाणी म्हणतात त्यांनी वक्तव्य करताना विचार करायला हवा. तुमच्यावर आता ठपका पडल्यानंतर एवढं घायाळ होण्याची गरज काय, असा सवाल गोगावले यांनी उपस्थित केला.
ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला यश - शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाविरोधात आंदोलने करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने शिंदे गटाला कौल दिला आहे. जनतेनेही शिंदे गटाची भूमिका स्वीकारली आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाला मोठा प्रतिसाद मिळेल असे, गोगावले यांनी सांगितले. तसेच दसरा मेळाव्याबाबत अद्याप परवानगी मिळालेल्या नाहीत. ज्या ठिकाणी परवानगी मिळेल, तेथे शिवसेनाप्रमुखांना साजेसा मेळावा करू, असा निर्धार गोगावले यांनी केला.