मुंबई - भांडुप ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रभात रहांगदले यांना चौकशी करून याबाबतचा अहवाल १५ दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
चौकशीचे आदेश -
भांडुप येथील ड्रीम्स मॉलला गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास आग लागली. या आगीची झळ पोहचल्याने याच मॉलमध्ये असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील सनराईज हॉस्पिटलमधील ७८ रुग्णांना अग्निशमन दलाला शिडीच्या साहाय्याने बाहेर काढावे लागले होते. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही २२ जणांचा शोध लागलेला नाही. इतर रुग्ण मुंबईमधील विविध रुग्णालयात उपाचार घेत आहेत. या आगीच्या सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले होते. यानुसार पालिका आयुक्तांनी रात्री उशिरा आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
कशी होणार चौकशी -
ड्रीम्स मॉल, सनराईज हॉस्पिटल आगीची आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रभात रहांगदले यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. आग का लागली, बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले होते का, मॉल आणि रुग्णालयांना सर्व परवानग्या देण्यात आल्या होत्या का, परवानग्या नसल्यास त्यात कोणत्या अधिकाऱ्यांचा दोष आहे, अग्निसुरक्षा यंत्रणा होती का, अग्नीसुरक्षा प्रमाणपत्र होते का, आदी चौकशी केली जाणार आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचा सविस्तर अहवाल येत्या १५ दिवसात सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
११ मृत्यू, ५ जखमी, २१ बेपत्ता -
२५ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास ड्रीम्स मॉल, एल. बी. एस. मार्ग, भांडुप पश्चिम येथे सनराईझ हॉस्पिटलमध्ये आग लागली. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे १४-फायर वाहन आणि १०-जम्बो वॉटर टँकरच्या सहाय्याने तब्बल २३ तासांनी काल रात्री ११ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. काचेची इमारत, त्यात कोंडून राहिलेला धूर, मॉलमध्ये आत शिरण्यास अपुरी जागा यामुळे आग विझवण्याच्या कामात अनेक अडचणी आल्या. हॉस्पिटलमधील ७८ पैकी ४६ रुग्णांना इतर रुग्णालयात भरती करण्यात आले. ११ जणांचा यात मृत्यू झाला आहे. तर इतर २१ जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही.
हेही वाचा- 'फॅशन स्ट्रीट'च्या आगीत 500 पेक्षा जास्त दुकाने खाक