मुंबई - 2012 मध्ये काँग्रेसच्या काळात पेट्रोल 63 रुपये होते, त्यावेळेस बऱ्याच सेलिब्रिटींनी ट्विटरवर ट्विट करून या संदर्भात आपले मत प्रकट केलेल होते . काही जण देशाचे भारतरत्न असताना भाजपचे भारतरत्न होऊन ट्विट करत असल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. 63 रुपये पेट्रोलचा भाव 2012 मध्ये असताना अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुपम खेर यांच्याकडून यासंदर्भात टीकात्मक पोस्ट करण्यात आली होती. मात्र, 2012 ला कलियुग म्हणणाऱ्या या सेलिब्रिटींनी सध्याच्या परिस्थितीत पेट्रोल 94 रूपयांपर्यंत गेल्यानंतर कुठले युग आहे हे सांगावे असे भाई जगताप यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले भाई जगताप -
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना यासंदर्भात भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून ट्विट केले गेले आहे. सचिन तेंडुलकर हे आमचे एकेकाळी खासदार होते, अमिताभ बच्चन यांना आता इंधनाचे वाढलेले दर दिसत नाहीत का? त्यावर ते काही बोलायला तयार नाहीत. आता पेट्रोलचे दर 94 रुपये वाढले असताना अक्षयकुमार काय चालत सगळीकडे फिरतोय का? अनुपम खेर यांचा ड्रायव्हर आता पायी चालतोय का असाही सवाल भाई जगताप यांनी विचारून अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुपम खेर यांचा समाचार घेतला आहे.