मुंबई - कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने आण करताना व वीजपुरवठा सुरळीत ठेवताना मोठ्या प्रमाणात बेस्ट कामगार कोरोनाबाधित झाले. तर काहींना आपला जीव गमवावा लागला. नुकतेच बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने बेस्ट प्रशासनाविरोधात मूक निदर्शन आंदोलनाला सुरूवात केली आहे. याबाबत बेस्ट कामगारांना काय वाटतय यासंबंधी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा...
मुंबईच्या रेल्वे सेवेनंतर सर्वात जुनी दळणवळण आणि मुंबईची लाईफलाईन अशी ओळख म्हणजे बेस्ट बस. मुंबईच्या इतिहासात व अनेक आपत्तीत बेस्ट सेवा अविरतपणे सुरू राहिली. आजही कोरोनाच्या संकटात बेस्ट कामगार दिवसरात्र सेवा देण्यास तयार आहेत. मात्र, आम्हा कामगारांना प्रशासनाने योग्य ती वैद्यकीय सेवा द्यावी, अशी इच्छा बेस्ट कामगारांनी व्यक्त केली आहे.
नुकतीच सामान्य प्रवाशांसाठी बेस्ट सेवा सुरू झाली. बेस्ट बसमध्ये सामाजिक अंतर पाळण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, दररोज बेस्ट वाहक हा हजारो प्रवाशांच्या संपर्कात येतो. त्यामुळे त्याचा परिणाम कोरोनाच्या रुपात त्याला सहन करावा लागणार. बेस्ट वाहक व चालक यांचा धोका पाहता बेस्ट प्रशासनाने पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध करावी. बेस्ट आगारात वैद्यकीय सामुग्री, डॉक्टर व जागा उपलब्ध आहे. एखादा बेस्ट कर्मचारी कोरोनाबाधित झाल्यावर त्यालाही रुग्णालयात दाखल करेपर्यंत अनेक गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील असलेल्या बेस्ट प्रशासनाने कामगारांचा विचार करून बेस्ट आगारात कोविड रुग्णालय उभारावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
आजही घरातून कर्तव्यसाठी निघताना मनात भीती कायम असते. तरी आम्ही आमची सेवा बजावत असतो. आता बेस्ट प्रशासनाने वैद्यकीय सेवेचा विचार करावा असे बेस्ट कामगारांकडून सांगण्यात आले.