मुंबई - मुंबई महापालिकेचा उपक्रम असलेल्या बेस्ट उपक्रमात मोठ्या प्रमाणात चिल्लर जमा होते. ही चिल्लर पगारातून बेस्ट कर्मचाऱ्यांना दिली जाते. यामुळे कर्मचारी आणि कामगार संघटनांनी अनेकवेळा नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, यंदा कर्मचाऱ्यांना पगारातून चिल्लर देण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.
बेस्टकडे जमा असलेली चिल्लर आणि नोटा अशी सर्वच रक्कम येत्या दोन दिवसात स्टेट बँक ऑफ इंडियाकडून उचलली जाणार आहे.
बेस्टकडे मोठ्या प्रमाणात चिल्लर -
मुंबई महापालिकेचा बेस्ट उपक्रम हा अंगीकृत उपक्रम आहे. बेस्टकडून मुंबई शहरातील १० लाख ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. तसेच ३ हजाराहून अधिक बसेसच्या माध्यमातून ३० लाखाहून अधिक प्रवाशांना परिवहन सेवा दिली जाते. बेस्टची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. बेस्टवर ४ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यासाठी पालिकेने बेस्टला आतापार्यंत २१०० कोटी रुपयांचे आर्थिक सहायय केले आहे. बेस्टने आपले उत्पन्न वाढावे म्हणून दोन ते तीन वर्षांपूर्वी कमीत कमी भाडे ५ रुपये केले. तेव्हापासून बेस्टकडे २, ५ रुपयांची चिल्लर आणि १० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात जमा झाल्या आहेत.
हेही वाचा-18 ते 45 वयोगटासाठी कोरोना लसीकरण खुले करा- फिक्कीची सरकारकडे मागणी
बँकेचा करार संपला -
बेस्टच्या कंडक्टरकडून प्रवाशांना तिकीट देताना १, २ आणि ५ रुपयांची चिल्लर जमा होते. बेस्टच्या १०० ते १५० संग्रहण केंद्रांवर ही चिल्लर जमा केली जाते. या संग्रहण केंद्रांवर जमा होणारी रक्कम एका खासगी बँकेत जमा केली जाणार होती. त्यासाठी बँकेकडून ही रक्कम उचलण्याची व्यवस्था केली जाणार होती. मात्र सध्या बँकेसोबत असलेला करार संपल्याने बेस्ट उपक्रमाकडे मोठ्या प्रमाणात चिल्लर पडून आहे. आयसीआयसीयआय या खासगी बँकेसोबत असलेला करार संपला असून सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियासोबत करार करण्यात आला आहे. स्टेट बँक पुढील दोन दिवसात बेस्टकडे असलेली सर्वच चिल्लरची रक्कम उचलणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना पगारात चिल्लर मिळण्यापासून दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा-आईस्क्रीमची वाढली मागणी ; किमतीत बदल होणार नसल्याचे अमुलचे संकेत
११ हजारांची चिल्लर आणि नोटा -
बेस्ट उपक्रमात सुमारे ४० हजार कर्मचारी अधिकारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना पगार देताना गेले काही वर्षे अधूनमधून ११ हजारांची चिल्लर दिली जाते. त्यात २, ५ रुपयांचे नाणी आणि १०, ५०, १००, ५०० रुपयांच्या नोटा असतात. इतर पगार कर्मचाऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा केला जातो. याआधी १५ हजार रुपये चिल्लर दिली जात होती. ही लिल्लर घेऊन प्रवास करणे आणि खरेदी करताना चिल्लर घेतली जात नसल्याने त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.