मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बेस्टच्या इलेक्ट्रिक टॅक्सीचा फोटो व्हायरल केला जात आहे. यामुळे मुंबईत इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरू केल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता बेस्ट उपक्रमाने याबाबत खुलासा करत ही ही एक अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
बेस्ट प्रवाशांत संभ्रम
गेल्या काही दिवसांपासून लाल रंगाची बेस्ट इलेक्ट्रिक टॅक्सीच्या फोटो व्हायरल झालेला होता. त्यामुळे अनेकांनी ही फोटो शेअर करत ओला-उबरच्या धर्तीवर बेस्ट ई-टॅक्सी सेवा बेस्टकडून सुरू करणार असल्याचे बोलण्यात येत होते. विशेष म्हणजे एका लाल रंगाच्या मोटार कारवर बेस्ट उपक्रमाचा लोगो तसेच 'बेस्ट इलेक्ट्रिक टॅक्सी' असा उल्लेख आणि त्यासोबत चालकाचा गणवेश परिधान केलेला एक व्यक्ती असे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या छायाचित्राबाबत मुंबईकर जनता, बेस्ट प्रवाशांच्या मनात संभ्रमाचे वातावरण तयार झाले. बेस्ट उपक्रमाने खरोखरच अशा प्रकारची टॅक्सी सेवा सुरू केली आहे का, किंवा भविष्यकाळात सुरू करण्याचा विचार आहे का, असे विविध गैरसमज या छायाचित्रामुळे निर्माण झाले.
'मजकुरावर विश्वास ठेवू नये'
बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी ईटीव्ही भारताला सांगितले, की सध्या सोशल मीडियावर 'बेस्ट इलेक्ट्रिक टॅक्सी' असा उल्लेख असलेले छायाचित्र व्हायरल होत आहे. मात्र अशाप्रकारची कोणतीही टॅक्सी सेवा बेस्ट उपक्रमाद्वारे सुरू करण्यात आलेली नसून नजिकच्या काळात तशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे मुंबईकर जनता, बेस्ट प्रवासी, त्याचप्रमाणे पत्रकार बंधू-भगिनींनी अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या कोणत्याही छायाचित्र किंवा मजकुरावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.