मुंबई - पगार वेळेत मिळत नसल्याच्या निषेधार्थ बेस्टमधील कंत्राटी चालकांनी काल (मंगळवार) पासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. थकित वेतन व पगार येत्या २५ मेपर्यंत देण्याचे आश्वासन मिळाल्याने आज (बुधवारी) हा संप मागे घेतल्याचे चालकांनी सांगितले.
काम बंद आंदोलन - बेस्ट आर्थिक संकटात असल्याने खासगी कंत्राटदाराकडून भाडेतत्वावर बस चालवल्या जात आहेत. बेस्टच्या ताफ्यात सुमारे १ हजार २०० भाडेतत्वावरील बस चालवण्यात येत आहेत. या बस सहा कंत्राटदारांकडून पुरविण्यात आल्या आहेत. त्यापैकी एम.पी.ग्रुप या कंत्राटदाराकडून चालकांना वेळेवर पगार दिला नसल्याने चालकांना आंदोलन करावे लागते आहे. आतापर्यंत चार वेळा काम बंद आंदोलन करावे लागले आहे. मंगळवारी बेस्टच्या वडाळा, कुलाबा, विक्रोळी, वांद्रे, कुर्ला आगारातील कंत्राटी चालकांनी काम बंद आंदोलन केले. हे आंदोलन दुसऱ्या दिवशी बुधवारीही सुरू ठेवण्यात आले. दिवसभरात ३०८ कंत्राटी बसेस चालवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे बेस्टने आपल्या १०८ बसेच चालवून प्रवाशांना सेवा दिली.
आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे - यापूर्वी अनेकवेळा चालकांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. सतत पगाराच्या तारखा बदलत असल्याने चालकांना कुटुंब चालवणे कठीण झाले आहे. पीएफसह अन्य देणीही थकविल्याने चालकांमध्ये असंतोष आहे. प्रशासनाने नियमानुसार कंत्राटदाराला दंड आकारला. मात्र, तरीही वेतन व इतर देणी वेळेत मिळालेली नाही. एम.पी. ग्रुप या कंत्राटदाराकडून सातत्याने पगार देण्यास विलंब केल्याने कंत्राटी चालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. १९ मेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही दिला होता. मात्र, येत्या २५ मेपर्यंत पगार व थकीत देणी देण्याबाबत संबंधित कंत्राटदाराकडून आश्वासन मिळाल्याने चालकांनी कामबंद आंदोलन मागे घेतले असल्याचे चालकांकडून सांगण्यात आले.
कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्याची मागणी - कंत्राटदाराच्या कंत्राटी बसवरील चालकांचे वेतन वेळेवर न दिल्यामुळे या आधीही संप करण्यात आला होता. त्यामुळे वारंवार चालकांचा पगार न देणाऱ्या कंत्राटदारांचे कंत्राट तत्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे माजी बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली आहे.
हेही वाचा - Coastal Road Project : कोस्टल रोडवरील दोन खांबांतील अंतर ६० मीटर पुरेसे - राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्था