मुंबई - दिल्लीतील शेतकऱयांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या (8 डिसेंबर) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला देशातील विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा देत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मात्र, उद्या मुंबईत बेस्ट बस सुरू राहणार आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना -
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणाच्या शेतकऱयांचे दिल्ली मागील 12 दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रे्स, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर पक्ष आणि संघटनांनी उद्याच्या बंदला पाठिंबा दिला आहे. मात्र, या भारत बंदमध्ये मुंबईतील बेस्ट बस सहभागी होणार नसून, उद्या बेस्टच्या सर्व बस सुरू राहणार आहेत. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उद्या बसगाड्या सोडताना बसला संरक्षक लोखंडी जाळ्या लावण्यात येणार आहेत.
'दिल्ली चलो' आंदोलनाचा १२वा दिवस
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या दिल्ली चलो आंदोलनाचा आज (सोमवार) बारावा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून दिवसेंदिवस अधिक पाठिंबा मिळत आहे. सुरुवातीला केवळ पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरातमधील शेतकरीही दिल्ली सीमेच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवाय, आपापल्या राज्यांमध्येही शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत.
आठ डिसेंबरला भारत बंद..
आतापर्यंत शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या चर्चांच्या फेरींमधून कोणताही तोडगा समोर आला नाहीये. यापुढील चर्चेची फेरी ९ डिसेंबरला पार पडणार आहे. त्यापूर्वी आठ डिसेंबरला भारत बंद ठेवण्याचे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे. या भारत बंद दरम्यान आपत्कालीन सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही याबाबत आपण विशेष काळजी घेणार असल्याचे शेतकरी संघटनांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मुंबईत उद्या कॅब व रिक्षा राहणार सुरू
उद्याच्या भारत बंदला मुंबई टॅक्सी युनियनने पाठिंबा दिला नाही. त्यामुळे उद्या मुंबईतील कॅब व रिक्षा नियमितपणे सुरू राहणार आहेत.
हेही वाचा - दैनंदिन आहारातील मटण किती निरोगी? 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट